प्रोफेशनल्स, आयटीयन्स तरुणींनाच हवी सिझेरिअन प्रसुती!

0

पुणे (माधुरी सरवणकर) : कुणाची प्रसुती झाली असे कळले की, कुणीही हमखास सिझर की नॉर्मल? असा सवाल करतात; आणि बहुदा सिझर हेच उत्तर येते. बर्‍याचदा सार्वजनिक सुतिकागृहांमध्ये कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गुंतागुंत नसताना सिझेरिअन प्रसुती करण्याचा सल्ला डॉक्टर देतात; मात्र आता डॉक्टरांच्या जोडीला गर्भवती महिलादेखील नैसर्गिक प्रसुतीदरम्यान होणार्‍या कळा सहन होत नसल्याच्या कारणाने सातवा महिना चालू असतानाच, वैद्यकीय तज्ज्ञांना सिझर करण्याची मागणी करत आहेत. त्यात उच्चशिक्षीत, प्रोफेशनल्स, आणि आयटी व फायनान्स क्षेत्रातील युवतींचे प्रमाण जास्त आहे.

नैसर्गिक प्रसुतीपेक्षा 40 टक्के मुलींची सिझरला पसंती
पूर्वी शहर व ग्रामीण परिसरातील गरोदर महिलेच्या कुटुंबातील सदस्य नैसर्गिक प्रसुतीसाठी प्रयत्न करत असतं. नैसर्गिक प्रसुतीसाठी महिलेला नऊ महिने आणि सरासरी नऊ दिवस थांबावे लागत असे. गर्भारपणात कष्ट घेतले, काम केले तर नैसर्गिक प्रसुती सुलभ होते, तिला जास्त त्रास होत नाही असा त्याकाळचा समज होता. त्यामुळे नैसर्गिक प्रसुतीसाठी गरोदर महिलादेखील नऊ महिन्यांपर्यंत जमेल तसे काम करत असतं. मात्र आता मुलींची व घरच्या लोकांची मानसिकता बदलेली आहे. 40 टक्के तरुणी सिझर करण्याची मागणी वैद्यकीय तज्ज्ञांकडे करत आहेत. प्रसुतीच्या काळात होणार्‍या वेदना टाळण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. राज्यात शहरी भागांत सिझेरिअन शस्त्रक्रियांचे प्रमाण 26.3 टक्के तर ग्रामीण भागात हे प्रमाण 15.2 टक्के आहे. शहरी भागात खासगी सुतिकागृहांमध्ये प्रसुतीचे प्रमाण 38.4 टक्के असून, ग्रामीण भागात हे प्रमाण 27.5 टक्के आहे. सार्वजनिक प्रसुतीकेंद्रामध्येही सिझेरिअनचे प्रमाण वाढते असून, शहरात ते 16.6 टक्के तर ग्रामीण भागात ते 10.5 टक्के इतके असल्याचे 2015 -16 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक प्रसुतीपेक्षा सिझेरिअन प्रसुतीचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने अशा स्वरुपाच्या प्रसुतीना रोख लावण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार काही स्पष्ट निर्देश सुतिकागृहांना पाळणे बंधनकारक असल्याचे कळत आहे.

बहुतांशवेळा डॉक्टरांकडूनही केला जातो उगीच बाऊ!
गरोदर महिलांना सिझेरिअन शस्त्रक्रियांची खरेच आवश्यकता आहे का? असेल तर तशी शस्त्रक्रिया करण्यात यावी, असा केंद्रीय महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दंडक घालून दिलेला आहे. जागिक आरोग्य संघटनेनेदेखील सिझेरिअन प्रसुतीच्या प्रमाणात 10 टक्के वाढ होण्याचा व प्रसुतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यूदराचा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सिझेरिअन प्रसुती नेमक्या कोणत्या कारणांसाठी केल्या जातात असा प्रश्न उपस्थित होत होता. काही वैद्यकीय तज्ज्ञांशी बातचीत केली असता तरुणी स्वतः सिझर करण्याची मागणी करत असल्याचे उघडकीस आले. तर काही ठिकाणी बाळाच्या गळ्याला नाळेचे वेढे आहेत, काही वेळेस गर्भजल कमी झाले म्हणून तर काही वेळेस बाळाने पोटात शी केली व बाळाचे ठोके अनियमित झाले आहेत, अशी कारणे देऊन सार्वजनिक सुतिकागृहांत जादा पैसे कमविण्याच्या हेतूने विनाकारण सिझेरिअन हा पर्यायाचा वापरला जात असल्याचे समोर आले आहे.

नाळ अडकली, शी केली, चुकीचे समज!
सिझर करताना जी कारणे सांगितली जातत त्या कारणांमुळे बाळाच्या जीवाला धोका उद्भवत नाही. पोटातील बाळाला प्राणवायूचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा नाळेवाटे होत असतो. गर्भातील बाळाची फुफ्फुसे तयार झालेली नसतात जन्म झाल्यानंतर जेव्हा ते बाळ श्वास घेते तेव्हाच फुफ्फुसाचे कार्य सुरु होते. त्यामुळे नाळेचे हजार वेढे जरी बाळाच्या मानेभोवती पडले तरी नाळेतून होणारा रक्तपुरवठा कायम असल्याने बाळाला त्रास उद्भवत नाही. तसेच प्रसुतीची प्रत्येक कळ बाळाला गर्भाशयातून खाली ढवलण्यासाठी आणि गर्भाशयाचे तोंड उघडण्यासाठी असते. बाळाच्या पोटावर या क्रियेने दाब पडला की बाळाला शी होते. ही नैसर्गिक क्रिया आहे. बाळाला शी झाल्यावर त्याचे गुद्द्वार आणि आतडी विकसित आणि नॉर्मल असल्याचे लक्षण असते. तसेच ही विष्ठा जंतूरहीत असल्याने बाळाने शी गिळली तरी बाळाला धोका नसतो, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिली.

आयटी व फायनान्स क्षेत्रात काम करणार्‍या युवतींकडून सिझर शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीची मागणी होत असते. सातव्या महिन्यापासून मुली सिझर करा असे सांगतात. रोज 12 तास एका जागी बसून काम करावे लागत असल्याने व्यायाम बंद झाला आहे. या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होत आहे, रोज कामाचे येत असलेले टेन्शन, जागरण, उशीरा होत असलेली लग्ने यांचा परिणाम तरुणींच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे रक्तदाबातील दोष या समस्या तरुणींना जखडत असून, तरुणींचे सिझर कराव लागत आहे.
– डॉ. पंकज कुलकर्णी, स्त्रीरोगतज्ज्ञ, गॅलेक्सी हॉस्पिटल, पुणे

सध्या सिझेरिअन फारच सुरक्षित झाले आहे. माझ्याकडे येणार्‍या 30 टक्के मुलीदेखील नैसर्गिक प्रसुतीच्या कळा सहन होणार नाही म्हणून सिझेरिअनची मागणी करत आहेत. तसेच बरेचजण मुहुर्त काढून आमच्याकडे येतात. अशा वेळेस नैसर्गिक प्रसुती करायची असली तरी करता येत नाही. आता बाळांचे वजनदेखील वाढले आहे, त्याचप्रमाणे प्रसुतीच्यादरम्यान बाळाच्या गळ्याभोवती एक नाळ असेल तर चालून जाते मात्र फास असेल तर अडचणी येतात, अशा वेळेस सिझेरिअन हा पर्याय रुग्णांकडून निवडला जातो.
– डॉ. सुनीता तेंडुलवाडकर, स्त्रीरोगतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक, पुणे