प्रो लीग स्पर्धेतून खेळाडूंवर होणार बक्षिसांचा वर्षाव!

0

मुंबई ।  कबड्डीला व्यावसायिक स्वरूप आल्यापासून या खेळाला देशात नव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे ठरले आहे प्रो-कबड्डी लीग. प्रो कबड्डी लीगचा यंदा पाचवा हंगाम आहे. येत्या 28 जुलैपासून या नव्या पर्वाची सुरुवात होणार असून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या लीगचे महत्त्व वाढत असतानाच संघांना आणि खेळाडूंनादेखील महत्व प्राप्त होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रो-कबड्डीच्या बक्षिसांच्या रकमेत घसघशीत वाढ झाली आहे.

यंदा रकमेत 2 कोटींची वाढ
या पर्वात तब्बल 8 कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा या रकमेत 2 कोटींची वाढ झाली आहे. या सत्रामध्ये अनेक मोठ्या कंपन्या या स्पर्धेशी जोडल्या गेल्या आहेत. यामुळेच यंदाच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ झाली आहे.

प्रो-कबड्डीच्या यंदाच्या पर्वात अनुप कुमार, मनजीत चिल्लर यांच्यासह अनेक खेळाडूंच्या मानधनातही चांगलीच वाढ झालेली आहे. सामन्यात मिळणार्‍या बक्षिसांमधूनही खेळाडूंना घसघशीत रक्कम मिळणार आहे. यंदा विजेत्या संघाला 3 कोटी तर उपविजेत्या संघाला 1.8 कोटीचे बक्षिस मिळणार आहे. तर तिसर्‍या क्रमांकावर येणार्‍या संघाला 1.2 कोटींचे बक्षिस मिळणार आहे. याव्यतिरीक्त स्पर्धेतील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरला 15 लाख रूपए तर सर्वोत्कृष्ट चढाईपटूला 10 लाख, सर्वोत्कृष्ट बचावपटूला 10 लाख तर सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूला 8 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.