प्रौढाला मारहाण करून सात हजार रुपये लुटले

0

जळगाव। रेल्वे स्टेशन परिसरातील आकाश हॉटेलच्या ओट्यावर बसलेल्या प्रौढास पल्सवरून आलेल्या दोघांनी बेदम मारहाण करून प्रौढाजवळील सात हजार रुपये हिसकावून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रौढाने दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनादोन्ही चोरट्यांना चार तासातच पकडण्यात यश आले आहे. यातच त्यांनी पैसे चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

मोटारसायकलवरून आले दोघे
निवृत्तीनगरातील रहिवासी सुभाष सुकदेव पाटील (वय-48) हे शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशन परिसरातील आकाश हॉटेलच्या ओट्यावर बसले होते. रात्री 10 वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या पल्सर (क्रं. एमएच.19.एसी.6378) वरून दोन अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी काहीही कारण नसतांना सुभाष पाटील यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर त्यांच्या खिशात असलेले 7 हजार रुपये जबरीने हिसकावून तेथून पोबारा केला. त्या दरम्यान, पाटील यांनी चोरट्यांच्या गाडीचा नंबर पाहिला आणि लागलीच शहर पोलिस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितले.त्यानंतर पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे हे करीत असून रात्रीच त्यांना दोन्ही संशयित शिवाजीनगर पुलाजवळ असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर वासुदेव सोनवणे यांनी लागलीच डिबी कर्मचारी विजयसिंग पाटील व प्रितमसिंग यांनासोबत घेत शिवाजीनगर पुल गाठले. त्या ठिकाणी दोन्ही चोरटे अंधारात उभे दिसताच पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. विचारपुस केल्यानंतर दोघांना खाक्या दाखवताच एकाने संदीप उर्फ जान मधुकर निकम व दुसर्‍याने किरण अनिल बाविस्कर असे नाव सांगितले. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत रात्री अडीच वाजेच्या सुमारास अटक केली. दोन्ही चोरट्यांनी पोलिसांना चौकशी दरम्यान चोरी केल्याची कबूली दिली आहे. यातच रात्री 10 वाजता घटना घडल्यानंतर फक्त चार तासानंतरच चोरट्यांना पोलिसांना अटक करण्यात यश आल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.

22 पर्यंत पोलिस कोठडी
शुक्रवारी रात्री शहर पोलिसांनी संदीप उर्फ जान मधुकर निकम व किरण अनिल बाविस्कर (दोन्ही रा. गेंदालालमिल) या दोघांना अटक करण्यात येवून शनिवारी दुपारी दोघांना न्यायाधीश एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणावर न्यायालयात कामकाज होवून न्यायाधीश चौधरी यांनी दोन्ही संशयितांना 22 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.