प्लाझ्मा थेरपीपासून जीवाला धोका; आयसीएमआरचा इशारा

0

नवी दिल्ली – कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा उपचारपद्धती सध्या बरीच चर्चेत असली तरी ती पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यामुळे करोना रुग्णाच्या जीवालाही धोका उद्भवू शकतो, असा अतिशय स्पष्ट इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिला आहे.

कोरोना रुग्णांवर प्रायोगिक स्तरावर उपचार केल्या जात असलेल्या विविध पद्धतींमध्ये प्लाझ्मा उपचार पद्धतीचाही समावेश आहे. ‘प्लाझ्मा उपचारपद्धतीचा योग्य रितीने आणि मार्गदर्शक तत्वांनिशी वापर केला नाही तर त्यामुळे जीवाला धोका पोहोचवणारी गुंतागुंतही निर्माण होऊ शकते. जोपर्यंत या उपचारपद्धतीला मान्यता लाभत नाही किंवा तिची परिणामकारता सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याविषयी कोणत्याही स्तरावर केलेला दावा अनुचित ठरेल,’ असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. आयसीएमआरच्या मते, या उपचारपद्धतीचा प्रयोग पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोकाही उद्भवू शकतो. याबाबत आयसीएमआरने विस्तृत मार्गदर्शक तत्वे आधीच प्रसारित केली असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. कोरोनामुक्त व्यक्तीपासून धोका संभवत नाही. जे आधी बरे झाले त्यांना पुन्हा कोरोना झाला, अशा रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. हा ठोस पुरावा नाही. जो बरा झाला तो ठीक आहे, असे मानले जात आहे, असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.