दिवसा व रात्री पथकाची करडी नजर
खडकी : शनिवार 23 पासुन राज्यभरात प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी होणार आहे. त्यादृष्टीने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनानेही प्लास्टिकबंदी बाबत कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. बोर्ड परिसरात कडक अंमलबजावणी करिता प्रशासनाने दिवसा व राती अशा दोन पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यशासनाने काढलेल्या प्लास्टिकबंदीच्या आदेशाची शनिवारपासून कडक अंमलबजावनी करण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट प्रशासनाने घेतला आहे. आरोग्य निरिक्षक शिरिष पत्की व पाच कर्मचारीचे पथक दिवसपाळीमध्ये तर आरोग्य निरिक्षक रविंद्र वैकर व पाच कर्मचारीचे पथक रात्र पाळीत प्लास्टिकबंदी संदर्भात कडक नजर ठेऊन कठोर कायदेशीर व दंडात्मक स्वरुपाची कारवाई करणार आहेत.
वॉर्डात पत्रके वाटणार
माहिती आरोग्य अधिक्षक बी.एस.नाईक यांनी सांगितले की, खडकी बाजार पेठेतील दुकाननदार व्यावसायिक रात्री दुकानबंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा दुकाना बाहेर उघड्यावर टाकतात. या प्रकारास आळा घालून प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करण्याकरिता रात्रीच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्लास्टिकबंदी करिता जनजाग्रुती मोहिमे अंतर्गत प्रत्येक वॉर्डमध्ये पत्रके वाटप, अतिक्रमणाच्या वाहनातुन ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात येणार आहे.प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करिता प्रथम गुन्ह्या करिता दोन हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.
बोर्डाच्यावतीने कारवाई
दंडात्मक स्वरूपातील कारवाईबाबत बोलताना नाईक म्हणाले की, दुसर्या गुन्ह्याकरीता पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई तर तिसर्या गुन्ह्याकरिता कायदेशीर न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने दुकानदार व्यवसायिक व नागरिकांना सदर प्रकरणी सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुकानदार व व्यवसायिकांनी कागदी पिशवींचा वापर करावा किंवा दुकाना बाहेर नागरिकांनी वस्तु नेण्यासाठी सोबत पिशवी आणावी असे सुचनाफलक लावावे. तसेच नागरिकांनी सोबत कापडी ज्युट स्वरुपाच्या पिशव्या ठेवाव्यात. पाण्याकरिता स्टील किंवा काचेची बाटली सोबत ठेवावी. दुध व मांसाहारी पदार्थ आणण्यासाठी स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा, असे बोर्डाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.