आमदार महेश लांडगे यांनी राबविला उपक्रम
भोसरीः शासनाने 23 जून रोजी प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णय न घेता, निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरु झाली. हजारो किलो प्लास्टिक आणि लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आजकाल सर्वच वस्तू प्लास्टिकच्या मिळत आहेत. त्यामुळे प्लास्टिकला नागरिकांनी जगण्याचा मुलाधार मानला आहे. प्लास्टिक मानवी जीवनासाठी आणि पृथ्वीसाठी अतिशय घातक आहे. प्लास्टिकचे हे अतिक्रमण रोखण्यासाठी भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे सज्ज झाले आहेत. त्यांनी पालखीचे स्वागत करताना पर्यावरण पूरक संदेश देणारा पेहराव केला. ‘झाडे लावा ठायी ठायी, मिटून जाईल पाणी टंचाई’, ‘प्लास्टिक नहीं कोई शान, मिटा दो उसका नामो-निशान’, ‘प्लास्टिक वापरापासून राहू दूर, वसुंधरेचे संरक्षण होईल भरपूर’, ‘पर्यावरणाचे प्रदूषण करू नका, प्लास्टिक अट्टहास धरू नका’, ‘प्लास्टिक हटवा, देश वाचवा’, ‘पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा’, ‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ अशा प्रकारचे संदेश नैसर्गिक रंगांनी आपल्या कपड्यांवर लिहून त्यांनी प्लास्टिकमुक्ति आणि पर्यावरण पूरकतेचे संदेश दिले.
हीच विठ्ठल सेवा
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी पंढरपूरला जाणार्या प्रत्येक वारकर्यांमध्ये विठुमाउली वास करत असते. त्यामुळे आळंदीहून जाणार्या वारकर्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा मानली पाहिजे. आमदार महेश लांडगे यांच्यातर्फे दिंडीतील वारकर्यांना भेटवस्तू, छत्री, टोप्या आणि खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले. भोसरीमार्गे पालखी पुण्याच्या दिशेने रवाना झाली. यावेळी वारकर्यांच्या चेहर्यावर निखळ आनंद होता.