नवी मुंबई । प्लास्टिक आणि थर्माकोल हे मानवी आरोग्याला घातक असून आपण स्वत:चे व आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य चांगले राहावे याकरिता नैतिक जबाबदारी समजून स्वत:पासून व आपल्या घरापासूनच प्लास्टिकच्या वापराला प्रतिबंध करावा, असे नागरिकांना आवाहन करत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात येईल असे सांगितले.नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आयोजित प्लास्टिक व थर्माकोल प्रतिबंधात्मक विशेष कार्यशाळेप्रसंगी महापौर जयवंत सुतार आपले मनोगत व्यक्त करत होते. यावेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, सभागृह नेते रवींद्र इथापे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक दीपक पवार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नंदकुमार गुरव, जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबूकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.
शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी यावेळी बोलताना प्लास्टिकशिवाय आपण जगू शकतो हे लक्षात घेऊन कायदा झाला आहे म्हणून नाही तर आपली गरज म्हणून प्रत्येक माणसाने प्लास्टिक न वापरण्याचा निश्चय करायला हवा असे मत व्यक्त केले. स्वच्छता मोहिमेतील उत्स्फूर्त सहभागाप्रमाणेच प्लास्टिक व थर्माकोलमुक्त नवी मुंबई करण्यासाठीही सर्व घटकांचा संपूर्ण सहभाग लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्पादक, विक्रेते व वापरकर्ते नागरिक यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य नसेल त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिक संकलनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत संकलन केंद्रे सुरू करण्यात येतील असे ते म्हणाले.
नवी मुंबई शहरातील नागरिक प्रत्येक चांगल्या कामात नेहमीच आघाडीवर असतात असे स्पष्ट करत अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी शासनाच्या प्लास्टिकबंदी अधिसूचनेविषयी नागरिकांच्या मनात असलेल्या शंकाचे निरसन करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नंदकुमार गुरव यांनी सादरीकरणाव्दारे प्लास्टिक व थर्माकोलबंदीविषयक अधिसूचनेची विस्तृत माहिती दिली. अधिसूचनेव्दारे सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल तसेच ताट, कप, ग्लास अशा प्लास्टिकपासून बनविल्या जाणार्या व एकदाच वापरल्या जाणार्या डिस्पोजिबल वस्तू, अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी हॉटेलमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक भांडे, वाटी व स्ट्रॉ त्याचप्रमाणे नॉन वोव्हन पॉलिप्रॉपिलीन बॅग्ज, द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच व अन्नपदार्थ, धान्य साठविण्यासाठी आणि पॅकेजींगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक वेष्टन अशा विविध बाबींप्रमाणेच सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरास बंदी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बंदीव्दारे आपण आपलेच आरोग्य व भविष्य सुरक्षित ठेवत आहोत असे ते म्हणाले. प्लास्टिक वापराबाबतच्या गुन्ह्यास पहिल्या वेळी 5 हजार रूपये, दुस-या गुन्ह्यास 10 हजार व तिसर्या वेळी 25 हजार रुपये दंड आणि 3 महिने कारावास अशी तरतूद असल्याची त्यांनी माहिती दिली.