जळगाव । पर्यावरणासोबतच वसुंधरेचे रक्षण काळाची गरज बनली असतांना प्रदुषणांवर नियंत्रण मिळविण्या ऐवजी त्यात भर घालण्यात प्लास्टिक पिशव्यांची मोलाची भूमिका ठरत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. मोकाट फिरणार्या मुक्या प्राण्यांच्या मृत्यूस प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरत आहेत. मात्र, प्लास्टिक पिशव्या बंदी अंमलबजावणीचा शहरात पार फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे प्लास्टिक पिशव्या वापरणार्या विक्रेत्यांवर कारवाई करणे अपेक्षित असतांना आरोग्य अधिकारी याकडे काना डोळा करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी
शहरातील फळ विके्रत्यांकडे तसेच भाजी व्यवसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचे सर्रासपणे वापर करण्यात येत आहे. आरोग्य विभागाद्वारे किरकोळ कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई सुद्धा थंडावली आहे. आरोग्य विभागाचा प्लास्टिक पिशव्या वापरणार्यांवर वचक राहिलेला नाही. 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडी असणार्या प्लास्टिक पिशव्या आरोग्यास धोकादाय ठरत असतात.
पर्यावरणास घातक
प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नसल्याने या पिशव्या मोकाट जनावर खात असतात. या पिशव्याचे विघटन होत नसल्याने जनावरांना आजार जडत आहेत. प्लास्टीक पिशव्या गटारींमध्ये टाकण्यात येत असल्याने गटारी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. पातळ प्लास्टिक पिशवी अविघटनशील असल्याने कुजत नाही व नष्टही होत नाही. या पिशव्यांची पुर्नप्रक्रियाही होत नाही.
महापालिका उदासीन
शासनाने अधिनियम 2006 अन्वये 3 मार्च 2006 पासून प्लास्टिक पिशवी बंदीसाठी नियम व अटी लागू केल्या असल्या तरी कायद्याची अंमलबजावणी करणारत महापालिका प्रशासन उदासीन उसल्याने या कायद्याला केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे चित्र आहे. किराणा दुकाने, हॉटेल्स, जनरल स्टोअर्स, फळ, भाजी विक्रेते कायदा धाब्यावर बसवून राजरोसपणे 50 मायक्रॉन जाडीपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत.