प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी हा चांगला निर्णय

0

पनवेल । पनवेल महापालिकेने घनकचरा वर्गीकरण, तसेच प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असे चांगले निर्णय घेतले आहेत. नागरी सोसायट्यांनी ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करावे. अशा सोसायट्यांचाच कचरा महापालिकेतर्फे उचलला जाणार आहे. पालिकेचे हे धोरण योग्य असून, नागरिकांनीही या मोहिमेला साथ द्यावी तसेच प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भारतीय जनता पक्ष पनवेल आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील महिन्यात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला. त्यावेळी ठाकूर बोलत होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते सहा गटांमधून विजयी झालेल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. चित्रकला हा असा विषय आहे की ज्या कलेतून अभिव्यक्ती सादर करता येते. या माध्यमातून मनस्वी आनंद देणारी कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवता येते, असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विविध क्षेत्रांत प्रगती करत आहे. शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पूर्वी रायगड जिल्ह्यात टॅक्स भरणारे व्यावसायिक 20 हजार होते. आता ती संख्या एक लाख 25 हजारांंवर गेली आहे. करदात्यांनी भरलेला टॅक्स देशाच्या विकासकामात उपयोगी ठरणार आहे.