महापालिकेने केली कारवाई
पिंपरी: प्लास्टीक बंदी असतानाही व्यावसायिक उपयोगासाठी प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणार्या व्यावसायिकांच्या प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असून ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईत सात किलो प्लास्टीक जप्त करून पंधरा हजार रूपयांचा दंड वसूल केला. क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी आर.एम.भोसले व आरोग्य निरीक्षक सचिन जाधव यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली.
मासुळकर कॉलनी परिसरातील विविध व्यावसायिकांची तपासणी करीत असतांना तीन व्यावसायिकांकडून प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून सुमारे सात किलो प्लास्टिक जप्त करण्याबरोबरच पंधरा हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहराला स्वच्छ व सुंदर राखण्यामध्ये सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असून त्यासाठी प्लास्टीकचा वापर टाळावा असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.