प्लास्‍टिक पिशव्यांचा साठा आढळेल त्‍या दुकानाचा परवाना रद्द

0
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा इशारा 
मुंबई-राज्‍यात प्लॅस्‍टिक बंदी अस्‍तित्‍वात आहे. पर्यावरणासाठी घातक असणा-या प्लॅस्‍टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्‍टिकबंदीच्या कायदयाची राज्‍यात काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. ज्‍या दुकानांमध्ये बंदी घातलेल्‍या प्लास्‍टिक पिशव्यांचा साठा आढळेल त्‍या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार असल्‍याचा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला आहे.
प्लास्‍टिकबंदी संदर्भात कठोर उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात पर्यावरण विभागाच्या अधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे या बैठकीला उपस्‍थित होते.ज्‍या दुकानांमध्ये प्लास्‍टिक पिशव्यांचा साठा आढळेल त्‍यांचा परवाना रदद करण्यात यावा.तसेच सर्व दुकानदारांकडून बंदी घालण्यात आलेल्‍या प्लास्‍टिकचा वापर करणार नाही अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे असे बैठकीत ठरविण्यात आले.
महाराष्‍ट्रातील प्लास्‍टिक बंदीचे देशपातळीवर स्‍वागत होत आहे.केंद्रीय पर्यावरण सचिवांनीही महाराष्‍ट्रात येउन याबाबतची माहिती घेतली आहे.न्यायालयानेही या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केले आहे.बंदी घालण्यात आलेल्‍या प्लास्‍टिक पिशव्यांचा साठा संपविण्यासाठी दहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.आता यापुढे अधिक संधी देण्यात येणार नाही असे रामदास कदम यांनी सांगितले.पुढच्या आठवडयात उच्चस्‍तरीय समितीची बैठक होणार असून प्लास्‍टिक बंदीच्या अधिसूचनेत सुधारणा करण्यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.