भारताच्या ‘चांद्रयान-1’ या मोहिमेत चांद्रभूमीवर पाण्याचे अस्तित्व आहे हे सिद्ध झाल्यानंतर अलीकडेच ‘नासा’ने मंगळावरही वाहते पाणी असल्याचे म्हटले होते. आता ‘नासा’च्या संशोधकांनी प्लुटोवरही बर्फाचे पाणी असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘नासा’ने प्लुटोच्या वातावरणाची आणि भूपृष्ठाची काही रंगीत छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.
कोलोरॅडोच्या एसडब्ल्यूआरआय संस्थेमधील संशोधक अॅलन स्टर्न यांनी सांगितले की, ‘क्विपर बेल्ट’ या नावाने ओळखल्या जाणार्या अवकाशीय ठिकाणी आकाश मोकळे आणि निळेशार दिसेल याची कुणीही कल्पना केली नव्हती. मात्र, प्लुटोचे आकाश असेच निळे आहे. तिथे अनेक छोट्या छोट्या बर्फाळ प्रदेशांचा छडा लागला आहे. तेथील धुक्याचे कण करड्या आणि तांबड्या रंगाचे दिसून येतात. मात्र हे कण निळ्या रंगाचा प्रकाश परावर्तीत करीत असल्याने नव्या क्षितीज विज्ञान संशोधकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. प्लुटोवर या बर्फाच्या रुपात पाण्याचे अस्तित्व आहे. हे बर्फ वितळून निर्माण झालेले द्रवरुप पाणीही तिथे अस्तित्वात असू शकते.