प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता नागरिकांना मोजावे लागणार वीस रुपये

0

पुणे । मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्लॅटफॉर्म तिकीटांचे दरात वाढ केली असून आता प्लॅटफॉर्म चिकीटासाठी 10 रूपयां एवजी 20 रूपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ गुरूवार पासून करण्यात आली असून 15 जून अखेर राहणार आहे. प्लॅटफॉर्म तिकीट न घेता नागरिक रेल्वे स्थानकावर आले, तर त्यांना किमान 250 रुपये दंड होणार आहे. अचानक केलेल्या दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

प्रवासी तिकीटापेक्षा प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर जास्त
पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट 20 रुपयांना झाले आहे. मात्र, पुणे-लोणावळा लोकलचे तिकीट 15 रुपये, पुणे- दौंड तिकीट 20 रुपये ,पुणे-उरुळी कांचन, देहूरोड प्रवासाचे तिकीट 10 रुपये, तर पुणे-आकुर्डी प्रवासाठी लोकलचे तिकीट 5 रुपये आहे.

फक्त पुण्यासाठी दरवाढ
प्लॅटफॉर्म तिकिटाचे वाढलेले दर पुणे विभागात केवळ पुणे रेल्वे स्टेशनसाठीच लागू असतील. शिवाजीनगर, खडकीसह अन्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर दहाच रुपये असतील. पुणे रेल्वे स्थानकावरून लोकलसह दररोज सुमारे 218 गाड्यांची ये-जा होते. सुमारे एक लाख 10 हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्लॅटफॉर्म तिकीट काढून दररोज स्थानकावर येणार्‍यांची सरासरी संख्या सुमारे 6 हजार 300 असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.

लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. त्यामुळे रेल्वेला काही जादा गाड्या सुरू कराव्या लागतात. त्यामुळे स्थानकावर पुरविण्यात येणार्‍या सोयी-सुविधांसाठी जादा कर्मचारी हे कामाला ठेवावे लागतात. त्याचबरोबर अनेक कर्मचार्‍यांना ओव्हरटाईम सुद्धा करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आली असल्याचा खुलासा रेल्वे प्रशासनाने केला आहे. प्लॅटफॉर्म तिकीट वीस रुपये केल्याने आता प्रवाशांना सोडायला येणार्‍यांची गर्दी थोडी आटोक्यात येईल, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. शहरातील रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवायचे असतील, तर केंद्रीय रेल्वे मंडळाने संबंधित विभागाच्या व्यवस्थापकांना अधिकार दिलेले आहेत. त्याचा वापर करीत पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविले आहेत.

प्रवाशांमध्ये नाराजी
अचानक प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. प्लॅटफॉर्म कुठल्याही सुविधा मिळत नसताना तिकिटात वाढ करण्याचे कारण काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर पुणे रेल्वे स्थानक वगळता अन्य स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट मिळत नाहीत, काही स्थानके तर अशी आहेत ज्याठिकाणी तिकीट खिडकी सुद्धा नाही. आजही पुणे रेल्वे स्थानकावर अनेक हॉकर्स बेकायदेशीर रित्या फिरत असतात. त्याचबरोबर अनेक भिकारी सुद्धा फिरतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही किंवा त्यांच्याकडून दंड गोळा केला जात नाही.असा सवाल प्रवाशांकडून करण्यात येत आहे.