प्लॅस्टिकच्या अफवांनी नासवले अंडे

0

मुंबई : आरोग्यासाठी उत्तम असलेल्या अंड्यांबाबत रोज खावो अंडे असे म्हटले जात असले तरी उन्हाची वाढती तिरीप पाहता आता मुंबईकरांना अंडे नकोसे झाले असल्याचे दिसते. मुंबईच्या मार्केटमध्ये अंड्यांचे दर घटताना दिसत आहेत. प्लास्टिकच्या अंड्यांची अफवा यासाठी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे अफवांमुळे बाजारातील अंडी नासली आहेत, असे म्हणायलाही काही हरकत नाही.अंड्यांचा ढासळता दर लक्षात घेता मुंईकरांनी अंड्याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसते. अंड्यांचे दर कमी होण्यामागे वाढते तापमान कारणीभूत असल्याचे प्रथम कारण आहे.

नागरिकांच्या आहारामध्ये अंड्यांना विशेष स्थान असले तरी उन्हाळ्यात मात्र ग्राहक अंड्यांना फारशी पसंती देत नसल्याचे दिसते. गेल्या काही महिन्यांपासून उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे 400 रुपये शेकडा दर असलेली अंडी सध्या 300 रुपयांपर्यंत आली आहेत. एवढेच नव्हे तर दरदिवशी हा दर घसरत असल्याचे दिसून येत आहे. सध्या अंडी 300 रुपये शेकडा, तर 36 रुपये डझनने मिळत आहेत. हाच दर चार दिवसांपूर्वी 330 रुपये शेकडा तर 40 रु. डझन इतका होता.

मागील काही दिवसांत बाजारात प्लास्टिकची अंडी मिळत असल्याच्या बर्‍याच अफवा पसरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली होती. मात्र तसे काही नसल्याचे सरकारतर्फे स्पष्ट देखील करण्यात आले. त्याचबरोबर आता उन्हाळा वाढत असल्याने अंड्यांसारखा उष्ण पदार्थ खाणे आरोग्यासाठी योग्य ठरणार नाही, अशी समज नागरिकांची झाली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या तडाख्यासोबत अफांचाही तडाखा संपूर्ण राज्यात बसत असल्याचे दिसते.

अंड हा उष्ण पदार्थ असल्याचा समज ग्राहकांनी केला असल्याने सहाजिकच अंड्यांच्या दारात घट झाली आहे. एका अंड्यामागे 50 पैशाने दर घटला आहे. त्यामुळे सध्या अंड्यांची आवक घटली आहे.
– अतुल महाजन,
व्यवस्थापक, पपक डॉटकॉम

हिवाळ्यात अंड्यांची खरेदी चांगली होत असली तरी उन्हाळ्यात अंड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात घसरते. वाढता उन्हाळा आणि प्लास्टिक अंड्याची अफवा यामुळे सध्या अंड्यांचा दर घटलेला दिसतो. मात्र प्लास्टिकची अंडी ही एक अफवा असून त्याबाबत लोकांनी साशंक राहू नये.
– संजित वैंगनकर,
बुरजी पाव व्यावसायिक