प्लॅस्टिक वापरून पुण्यात बनणार 25 किलोमीटरचे रस्ते!

0

पुणे (विशेष प्रतिनिधी) – प्लॅस्टिक कचरा पर्यावरणासाठी घातक अन् मानवी वापरासाठी डोकेदुखी बनत असताना त्याचा वापर रस्तेनिर्मितीसाठी करण्याचा प्रयोग अनेक शहरात यशस्वी झालेला आहे. पुण्यातदेखील सुमारे 25 किलोमीटरचे रस्ते प्लॅस्टिकचे मिश्रण वापरून केले जाणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली आहे. डांबर व प्लॅस्टिक यांच्या मिश्रणाचा वापर करून निर्माण केले जाणारे रस्ते दीर्घकाळ टिकावू ठरत असल्याचेही निदर्शनास आले आहे. पुणे महापालिकेने यासंदर्भातील पायलट प्रोजेक्ट नवी पेठ, विमाननगर आणि कोरेगाव पार्क या भागात राबविला होता. या भागातील रस्त्यांचा अनुभव पाहाता, हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाल्याबद्दल श्री कुमार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दोन कंपन्या करणार प्लॅस्टिक पुरवठा
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात प्लॅस्टिकचा वाढता वापर हा चांगलेच डोकेदुखी ठरलेला आहे. हे प्लॅस्टिक पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरलेले आहे. त्यामुळे ते पुनर्वापर झाले तर पर्यावरणाची समस्यादेखील सुटणार आहे. म्हणून, शहरातील रस्ते बांधताना त्याचा डांबरासोबत वापर केल्यास हे रस्ते चांगले तयार होतात. तसेच, डांबरही कमी लागते, त्यामुळे प्लॅस्टिक मिश्रणाचा वापर रस्तेनिर्मितीत करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतलेला आहे. फेकून दिलेले प्लॅस्टिक गोळा करून ते रस्तेनिर्मितीसाठीच्या कामात वापरले जात आहे. त्यामुळे कमी खर्चात टिकावू व दर्जेदार रस्ते निर्माण करता येत असल्याबद्दल पर्यावरण प्रेमींनीदेखील समाधान व्यक्त केले आहे. या कामासाठी पुणे महापालिकेला डाऊ केमिकल इंटरनॅशनल आणि रुद्र इन्व्हेरनमेंट यांचेदेखील हॉट मिक्ससाठी सहकार्य मिळत आहे. या कंपन्यांचा हा प्लॅन्ट येरवडा येथे उभारण्यात आलेला आहे. प्लॅस्टिकचे हे मटेरिअल आणखी 25 किलोमीटरच्या रस्ते बांधणीसाठी वापरण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे.

रस्ते पर्यावरणपूरक, दीर्घआयुष्यी होतात!
या दोन कंपन्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून टाकाऊ प्लॅस्टिक गोळा करत असून, त्यावर प्रक्रिया करून रस्त्यांच्या कामात वापरण्यासाठीचे मटेरिअल हॉट मिक्स प्लॅन्टमध्ये तयार करत आहे. हे मटेरिअल डांबरमध्ये वापरून त्याचा वापर रस्ता करण्यासाठी केला जातो. हा रस्ता दीर्घकाळ चांगला राहतो, व त्याचा वापर कितीही झाला तरी तो लवकर खराब होत नाही. या शिवाय, प्लॅस्टिकमिश्रित डांबरामुळे मातीची धूप होत नाही, तसेच रस्त्यात पाणी मुरण्याची प्रक्रियाही थांबते. 2015मध्येच भारत सरकारने अशाप्रकारचे रस्ते बनविण्यास परवानगी दिली होती. परंतु, त्याची फारसी अमलबजावणी झाली नाही. मात्र, पुणे महापालिकेने असे रस्ते निर्माणासाठी पाऊल उचलून पर्यावरणपूरक रस्ते बांधण्याचे काम हाती घेतले आहे.