पथकाचीही नियुक्ती नाही ; नागरीकांकडून सर्रास कॅरीबॅगचा वापर
भुसावळ- राज्य शासनाने प्लास्टिक पिशवी अथवा कॅरी बॅग वापरण्यावर 23 जूनपासून बंदी आणली आहे. प्लॅस्टीक साहित्य विक्री करणार्या विक्रेत्यांसह दुकानदार तसेच नागरीकांवर कारवाईचा दंडुका भुसावळ विभागात सुरू असताना वरणगाव नगरपालिकेला मात्र कारवाईचा विसर पडला आहे. वरणगाव पालिकेने साध्या पथकाचीही नियुक्ती केली नसल्याची ओरड असून शहरात सर्रासपणे कॅरी बॅगचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.
वरणगाव पालिकेत नूतन मुख्याधिकार्यांची प्रतीक्षा
तीन दिवसांपासून राज्यात शासनाच्या आदेशानुसार बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारे आणि वापर करणार्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे परंतु शहरातील मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची बदलीने त्यांच्या रीक्त झालेल्या जागेवर सावदा येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. शासनाच्या सक्त सूचना असतानादेखील पालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या उपायोजनांना अद्यापही प्राधान्य देण्यात आले नाही तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे शहरात कुठल्याही प्रकारे व्यापारी व नागरीकांना अद्यापही सूचना देण्यात आली नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतांना दिसून येत आहे. याबाबत पालिका प्रशासनाचे उदासीन धोरण असल्याचे दिसून येत आहे.
नागरीकांकडून स्वागत
प्लास्टिक बंदी कायद्याचे नागरीकांकडून स्वागत करण्यात येत आहे काही सुज्ञ नागरीक घराबाहेर वस्तू खरेदीला निघताना सोबत कापडी पिशवी घेऊन निघत आहे मात्र काही नागरीक आणि व्यापार्यांकडून आदेशाचे उल्लघंण होतांना दिसत आहे.