मुंबई । पहिले दोन सामने अत्यंत वाईट पद्धतीने गमावल्यानंतरही स्पर्धेत पुनरागमन करणा़र्या लालबाग लायन्सने आपल्या लौकिकानूसार खेळ करीत जावळीच्या वाघांची 34-23 अशी कत्तल केली आणि अभिनव कला क्रीडा अकादमी आणि ओ एच मिडिया हाऊस आयोजित महामुंबई कबड्डी लिग स्पर्धेच्या प्ले ऑफ सामन्यात धडक मारली. आता प्ले ऑफमध्ये गटात अव्वल स्थान पटकावणारा कुर्ला किंग्ज आणि दुस़र्या क्रमांकावर असलेला लालबाग लायन्स अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी एकमेकांशी भिडतील. लालबाग लायन्सविरूद्ध पराभव सहन करावा लागल्याने जावळीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून डी ऍण्ड डी टायटन्सने अंधेरी आर्मीचा 48-28 असा धुव्वा उडवून प्ले ऑफमध्ये स्थान मिळविले आहे.
कांदिवली कोब्राज आणि कुर्ला किंग्ज यांच्यातील थरारक सामना 24-24 असा बरोबरीत सुटल्याने कोब्राजनेही प्ले ऑफमध्ये स्थान प्राप्त केले. प्ले ऑफ लढतीमध्ये स्थान मिळवण्यासाठी सारेच संघ विजयाच्या इर्षेने खेळले. लालबाग लायन्सच्या अभिनव नरने जोरदार सुरूवात केल्यामुळे पाचव्या मिनीटालाच जावळी टायगर्सवर त्यांनी लोण चढवला.
लालबाग लायन्सने प्रारंभीच 9-4 अशी आघाडी घेतली. पण जावळी टायगर्सच्या राकेश खैरनार आणि रोहित जाधवनेही चढायांचा अप्रतिम खेळ करीत आपल्या संघाचा गुणफलक हलता ठेवला. त्यांचा अथक प्रयत्नानंतरही त्यांचा संघ लालबागपेक्षा पुढे जाऊ शकले नाही. त्यामुळे मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा लायन्सकडे 16-12 अशी आघाडी होती. मध्यंतरानंतरही लालबागकडे आघाडी कायम होती, पण त्याचवेळी रोहित जाधवच्या काही भन्नाट चढायांनी सामन्यात जान आणली. गुणफलक 27-21 असा असताना मैदानात लालबागचे केवळ दोनच खेळाडू होते.