जळगाव : प्लॉट विक्रीचे पैसे न दिल्याने महिलेसह तिच्या लहान भावाला शिवीगाळ करून चाकूने वार करत जखमी करण्यात आले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
शबाना शेख सलीम (35, न्यू ख्वाजा नगर, पिंप्राळा, हुडको) या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून त्यांनी त्यांचा प्लॉट विक्री केला होता. याचे पैसे शरीफ शेख याला मागितले असता याचा राग येवून गुरूवार, 19 मे रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास महिलेसह तिचा भाऊ नईम शेख यांना शिवीगाळ करून चाकूने वार करून जखमी केले. आसीफ शेख आणि अहमद शेख (पूर्ण नाव माहित नाही) यांनी नईमला मारहाण करून डोक्याला दगड मारून दुखापत केली. या प्रकरणी शबाना शेख सलीम यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर शुक्रवार, 20 मे रोजी संशयीत आरोपी शरीफ शेख, आसीफ शेख आणि अहमद शेख (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक विनोद सूर्यवंशी करीत आहे.