बंगळुरू । अवघ्या एक टनाच्या अतिरिक्त भारामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केलेल्या आयआरएनएसएस-1 एच या उपग्रहाचे प्रक्षेपण फसल्याची माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील तळावरून गुरूवारी संध्याकाळी सात वाजता पीएसएलव्ही सी 39 या प्रक्षेपकाच्या मदतीने आयआरएनएसएस-1 एच हा उपग्रह आकाशात झेपावला होता.
तिसर्या टप्प्यात अडचण
दोन टप्पे पूर्ण केल्यानंतर पीएसएलव्ही-सी39 ला तिसरा टप्पा पूर्ण करता आला नाही. पीएसएलव्ही-सी39 जी क्षमता आहे त्यापेक्षा एक टन अतिरिक्त वजन प्रक्षेपकामध्ये होते. त्यामुळे तिसर्या टप्प्यात हिट शील्ड वेगळी झाली नाही. ज्याचा परिणाम गतीवर झाला. उदहारणार्थ अंतिम टप्प्यात प्रतिसेकंद 9.5 किलोमीटरची गती हवी होती. पण ती 8.5 किलोमीटर राहिली असे इस्त्रोच्या उपग्रह केंद्राचे माजी संचालक एस.के. शिवाकुमार यांनी सांगितले. यामुळे यातील तिसरा टप्पा आणि एकंदरीतच पूर्ण मोहित फसल्याचे स्पष्ट झाले आहे.
खर्च वाया
या उपग्रहाच्या निर्मितीवर 120 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मागील 24 वर्षात पहिल्यांदाच उड्डाण अयशस्वी झाल्याचेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे. या उपग्रहाच्या उड्डाणाच्या चौथ्या टप्प्यात हिट शिल्ड वेगळे व्हायला हवेत होते, पहिले तीन टप्पे यशस्वी पार पडल्याने चौथा टप्पाही पार पडेल असे आम्हाला वाटले होते. मात्र या उपग्रहाच्या बाबतीत असे घडले नाही. उड्डाणाच्या वेळी घर्षणामुळे जी उष्णता तयार होते त्यापासून सॅटेलाईटचे रक्षण व्हावे म्हणून हिट शिल्ड लावले जाते. अंतराळात जेव्हा उपग्रह स्थिर होतो तेव्हा हिट शिल्ड वेगळी होती. मात्र यावेळी असे झाले नाही.
खासगी क्षेत्राच्या सहभागावर प्रश्नचिन्ह
आयआरएनएसएस 1 एच च्या निमित्ताने प्रथमच उपग्रह निर्मितीमध्ये खासगी क्षेत्राला यामध्ये सहभागी करुन घेण्यात आले होते. मात्र याला अपयश आल्यामुळे खासगी क्षेत्राचा सहभाग वादाच्या भोवर्यात सापडला आहे. परिणामी आगामी कालखंडात विविध मोहिमांमध्ये खासगी कंपन्यांना सहभागी करण्यासाठी काळजी घेतली जाईल हे स्पष्ट झाले आहे.