फक्त जाहिरातबाजी करण्यातच सरकार आघाडीवर!

0

मुंबई :– भाजपने सत्तेत येण्यापूर्वी शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक हमीभाव देण्याची घोषणा केली होती पण सत्तेत आल्यावर आता हमीभाव मागणा-या शेतक-यांवर गोळ्या झाडून त्यांना ठार मारले जात आहे. विकासाच्या बाता मारत केवळ जाहिरातबाजी करण्यातच सरकार आघाडीवर असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री आणि राजस्थान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी केली आहे. मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन पायलट यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.

यावेळी पायलट म्हणाले की, केंद्र सरकारने तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे आणि सरकारच्या कामकाजाचे मुल्यमापन करण्याची हीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. या सरकारने काँग्रेस सरकारने सुरु केलेल्या कामांची उदघाटने करून जाहिरातबाजी करण्याशिवाय काहीच केले नाही. देशात शेतकरी, दलित, अल्पसंख्याक, महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्व समाज घटकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे मात्र भाजपचे सरकार 900 शहरात 2200 कोटी खर्च करून देशात सर्व काही आलबेल आहे, देश किती प्रगती करतो आहे. अशा प्रकारची जाहिरातबाजी करित आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थानमध्ये शेतकरी मोठ्या संकटात आहे. तो रस्त्यावर उतरून हमीभाव आणि कर्जमाफीची मागणी करतोय. त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी पोलिसांकरवी गोळ्या घालून कष्टकरी अन्नदात्याला ठार मारले जात आहे. निवडणुकीत उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के अधिक हमीभाव देण्याचे आश्वासन देणारे आता हमी भाव मागणा-या शेतक-यांना गोळ्या घालत आहेत. भाजप सरकारने उत्तर प्रदेशातील शेतक-यांना कर्जमाफी दिली पण महाराष्ट्रातल्या शेतक-यांना कर्जमाफी का नाही ?असा सवाल त्यांनी सरकारला केला.

सेनेवरही टीका
यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनववर देखील कडाडून टीका केली. शिवसेना दिल्लीत वेगळे बोलते आणि मुंबईत वेगळे बोलते. आपण सत्तेत आहोत की विरोधात हे शिवसेनेने ठरवावे. शेतक-यांबद्दल एवढीच तळमळ असेल तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे पण शिवसेना सत्तेसाठी हापलेली आहे त्यामुळे सत्तेतून बाहेर पडणार नाही असे पायलट म्हणाले.