फक्त निवडणुकांसाठीच मोदी ओबीसी

0

नाना पटोले यांचा आरोप

नागपूर : आपण कनिष्ठ जातीतले आहोत असा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच करत आहेत. अन्यथा त्यांना ओबींच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही, असा खळबळजनक आरोप भाजपचे बंडखोर माजी खासदार नाना पटोले यांनी नागपूर येथे केला. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पटोले यांनी एका मुलाखतीत मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले आहे.

ओबीसींना स्वतंत्र मंत्रालयाची गरज नाही
पटोले म्हणाले, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, अशी मागणी मी जेव्हा केली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर ओरडले होते. तसेच याची खरंच गरज आहे का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला होता. ओबीसींना स्वतंत्र मंत्रालयाची गरज नसल्याचेही मोदी म्हटले होते. मोदी स्वतः ओबीसी समाजातून आल्याचा दावा करतात. मात्र, त्यांना ओबीसींच्या कल्याणाचे काहीही घेणेदेणे नाही. उलट त्यांच्या अशा वागण्यातूनच ते केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आपण कनिष्ठ जातीतले असल्याचे सांगतात असा खळबळजनक आरोप पटोले यांनी केला.

जनतेला दिलेली अश्वासने ते विसरले
राज्यातील फडणवीस सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारने निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अनेक अश्वासने दिली आणि त्यावर निवडणुका जिंकल्याही. मात्र, निवडून आल्याबरोबरच जनतेला दिलेली अश्वासने ते विसरले. 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्यावेळी विदर्भाच्या दौर्‍यावर आलेल्या मोदींनी आपला पक्ष सत्तेत आल्यास शेतकर्‍यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करु असे आश्वासन दिले होते. तसेच शेतमालाला दीडपट जास्त हमीभाव देऊ असेही ते म्हणाले होते. या आश्वासनांच्या जोरावर ते सत्तेत आले मात्र, त्यानंतर सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन सरकार स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करु शकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. यावरुन मोदी सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होते, असे पटोले म्हणाले.

शेतकरी प्रश्नावरून मोदी माझ्यावर रागावले
पटोले म्हणाले, गेल्यावर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान, शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठकही झाली होती. यावेळी आपण काही शेतकर्‍यांबाबत काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. मात्र, त्यावर पंतप्रधान माझ्यावर रागावले होते. दरम्यान, ओबींसींच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले तर पंतप्रधान पुन्हा माझ्यावर नाराज झाले होते. त्याचवेळी निराशेतून पक्ष सोडण्याबाबत माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. त्यानंतर मी पुन्हा मच्छिमारांचे प्रश्न, बंद होत असलेले उद्योग-धंदे, नोटाबंदी आणि जीएसटीचे झालेले वाईट परिणाम यांवर भाष्य केले. मात्र, सरकारने या सर्व प्रश्नांची कधीच दखल नाही, असे खुलासा पटोले यांनी केला आहे.