रोझलँड सोसायटी अग्रेसर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरातील हाऊसिंग सोसायट्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी’ स्पर्धेत सर्वाधिक गुणांक मिळालेल्या सोसायटी, गृहप्रकल्पांना 2018-19 या आर्थिक वर्षांच्या मिळकतकराच्या सामान्यकरात सवलत दिली आहे. पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी को-ऑफ हौसिंग सोसायटीला 15 टक्के सवलत देण्यात आली आहे. तर, चिंचवड, चापेकर चौकतील गोखले वृंदावन सोसायटीला आणि एम.एस.आर क्वीन्स टाऊन सोसायटीला सामान्य करात 10 टक्के सवलत देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.
केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शहरे हागणदारी मुक्त करणे व घनकचर्याचे व्यवस्थापन करून शहर स्वच्छ करणे हे दोन प्रमुख उद्दीष्ट्य आहेत. केंद्राच्या धर्तीवर 15 मे 2015 पासून राज्यातही ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ याची अंमलबजावणी सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फेही शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, नागरिक यांच्या सहयोगाने हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत नागरिकांचा सहभाग वाढवून शहरातील गृहप्रकल्पांमध्ये पर्यावरण पूरक आणि स्वच्छता विषयक स्पर्धा घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला.
तपासणीसाठी 4 लोकांची समिती
त्यासाठी ‘आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी’ बक्षीस योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेर्फे घेतला गेला. सन 2017 ते 2020 या तीन वर्षांच्या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात येत आहे. 12 ते 100 फ्लॅट, बंगलो, रो हाऊस असलेली सोसायटी आणि 100 हून अधिक फ्लॅट, बंगलो, रो हाऊस असलेली सोसायटी अशा दोन गटांसाठी ही स्पर्धा घेतली जाते. त्यातही प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयानिहाय एक या प्रमाणे आठ क्षेत्रीय कार्यालयात ‘आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी’ बक्षीस योजना 2017-18, 2019-2020 या कालावधीत तीन वर्षाकरिता राबविण्यास येत आहे. या स्पर्धेच्या तपासणीसाठी दोन महापालिका अधिकारी, एक अशासकीय संस्थेचा प्रतिनिधी आणि एक पत्रकार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सन 2017-18 या आर्थिक वर्षात ‘आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी’ बक्षीस योजना राबविण्यात आली. यामध्ये ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील दोन सोसायट्या, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयामधील चार, ‘ड’ कार्यालयामधील 8 सोसायट्या, गृहप्रकल्पांनी सहभाग घेतला. ‘क’, ‘इ’, ‘फ’, ‘ग’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील एकाही सोसायटीने स्पर्धेत सहभाग घेतला नाही. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील रावेत येथील नॅनो होम्स सहकारी गृह संस्था आणि चिंचवड येथील नक्षत्रम सोसायटी यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत.
मिळालेल्या गुणांनुसार दिली सवलत
अ, ब आणि ड क्षेत्रीय कार्यालयांनी पात्र सोसायटी, गृहप्रकल्प संस्थेच्या अर्जांची नियुक्त केलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी करुन सामान्य करामध्ये सूट देण्याची शिफारस केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक गुणांक मिळालेल्या पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी को-ऑफ हौसिंग सोसायटीमध्ये 878 फ्लॅट असून त्यांना 100 पैकी 82 गूण प्राप्त झाले आहेत. त्यांना सामान्य करात 15 टक्के सवलत देण्यात आली आहे. चिंचवड, चापेकर चौकतील गोखले वृंदावन सोसायटीत 159 फ्लॅट असून त्यांना 100 पैकी 70 गुण प्राप्त झाले आहेत. त्यांना सामान्य करात 10 टक्के सवलत देण्यात आली आहे. तर, चिंचवड येथील एम.एस.आर क्वीन्स टाऊन सोसायटीत 719 फ्लॅट असून त्यांना 100 पैकी 68 गुण मिळाले आहेत. त्यांना 10 टक्के सवलत देण्यात आली आहे. संबंधित कर संकलन विभागीय कार्यालयांनी निवड केलेल्या या सोसायटीतील मिळकतींना सामान्य करातील सवलत देण्यासाठी संगणक प्रणालीमध्ये योग्य ती दुरुस्ती करुन घ्यावी. निवड करण्यात आलेल्या सोसायट्या, गृहप्रकल्पातील मिळकतधारक सवलत मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कर संकलन विभागाला दिले आहेत.