फक्त सव्वा तीन तासांत खेळ संपला

0

कँडी । भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना कँडीमधील पल्लेकेले स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 487 धावा केल्या. त्यानंतर अवघ्या सव्वा तीन तासांमध्ये यजमान संघाचा पहिला डाव गुंडाळत भारताने श्रीलंकेला सलग दुसर्‍या कसोटी सामन्यात फॉलोऑन देत मोठ्या विजयाच्या दिशेने कूच केले आहे. भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येला उत्तर देताना श्रीलंकेचा पहिला डाव 135 धावांवर आटोपला. कर्णधार दिनेश चंडीमलने सर्वाधिक 48 धावा केल्या. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने या डावात पाच विकेट्स मिळवल्या. दुसर्‍या डावातही श्रीलंकेची खराब सुरूवात झाली. श्रीलंकेने दसर्‍या डावात एका विकेट्च्या मोबदल्यात 19 धावा केल्या होत्या.

पाचवा क्रिकेटपटू
श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकणारा हार्दिक पंड्या क्रिकेट कारकिर्दीत कसोटी सामन्याद्वारे पहिले शतक झळकवणारा भारताचा पाचवा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी विजय मांजरेकर, कपिलदेव, अजय आणि हरभजन सिंग यांनी क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक कसोटी सामन्यात ठोकले होते.

हार्दिकने मोडला कपिल देव, संदीप पाटील यांचा विक्रम
हार्दिक पंड्याने तिसर्‍या कसोटी सामन्यातील दुसर्‍या दिवशी कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकवले. या खेळीदरम्यान हार्दिकने केलेला विक्रम अद्याप कुठल्याही भारतीय फलंदाजाला शक्य झाला नव्हता. या सामन्यात कसोटी सामन्यातील एका षटकात जास्त धावा करण्याचा उच्चांक रचत हार्दिकने माजी कर्णधार कपीलदेव आणि धडाकेबाज फलंदाज संदीप पाटील यांना मागे टाकले. कपिल देवने इंग्लंडच्या एडी हेमिंग्सच्या एका षटकात सलग चार षटकार ठोकत 24 धावा केल्या होत्या.

संदीप पाटील यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज बॉब विलीसच्या गोलंदाजीवर एकाच षटकात 24 धावा वसुल केल्या होत्या. आता हार्दिकने श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मलिंदा पुष्पककुमाराच्या एका षटकात दोन चौकार आणि तिन षटकार ठोकत 26 धावा केल्या. या कामगिरीमुळे कसोटी क्रिकेटमधील एका षटकात सर्वाधिक धावा करणारा हार्दिक पंड्या सातवा फलंदाज बनला आहे. एका षटकात सर्वाधिक धावा करणार्‍यांच्या यादीत वेस्टइंडिजचा ब्रायन लारा पहिल्या क्रमांकावर आहे.

सर्वात छोटा तिसरा डाव
भारताच्या गोलंदाजांनी रविवारी श्रीलंकेच्या फलंदाजांना खेळपट्टीवर उभे राहू दिले नाही. षटकांचा विचार केल्यास श्रीलंकेच्या संघाची मायदेशातील तिसर्‍या क्रमांकाची कमी धावसंख्या आहे. श्रीलंकेचा डाव 37.4 षटकात 135 धावांवर आटोपला. 1994 मध्ये पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात कँडीमध्ये श्रीलंकेचा डाव 28.2 षटकात आटोपला. त्यानंतर 2016 मध्ये पल्लेकेलेमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 34.2 षटकात गुंडाळले होते. डावाचा पराभव टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 333 धावांची आवश्यकता आहे.