फक्त 3 रूपयात नाश्ता, 5 रूपयात जेवण

0

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार सत्तेत आल्यापासून वेगवेळ्या निर्णयांमुळे सतत चर्चेत आहे. सरकारी कर्मचार्‍यांना शिस्तीचे धडे, मुलींची छेडछाड रोखण्यासाठी अ‍ॅण्टी रोमियो स्क्वॉड, शेतकर्‍यांचे एक लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ, आदी निर्णय घेतल्याने योगी सरकार सातत्याने चर्चेचा विषय ठरले आहेत. मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकाने सुरू केलेली दीनदयाळ भोजन योजना व तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी सुरू केलेली अम्मा कॅन्टीन या योजनांवर आधारित अन्नापूर्णा भोजनालय सुरू करण्यासाठी आदित्यनाथ सरकारने पावले उचलली आहेत. या योजनेंतर्गत फक्त 3 रूपयात नाश्ता आणि 5 रूपयात दोनवेळचे जेवण गोरगरिबांना मिळणार आहे.

स्थानिक माध्यमांनी सरकारी सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अन्नपूर्णा भोजनालय योजनेचा प्रस्ताव तयार असून मुख्य सचिवांना त्याचे प्रेझेंटेशन दाखविले गेले आहे. 12 एप्रिल रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुध्दा हे प्रेझेंटेशन पाहणार आहेत. या योजनेनुसार सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे भोजन दिले जाणार आहे. नाश्त्यामध्ये दलिया, इडली-सांभार, पोहे आणि चहा-भजी तर जेवणात चपाती, भाजी, डाळ आणि भात दिला जाणार आहे. योजनेनुसार राज्यातील सर्व शहरी भागात केंद्रे उघडली जाणार आहेत. ज्या भागात गरिब आणि कामगारांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी ही भोजनालये उघडली जाणार आहेत.

भाजपचे सरकार असलेल्या मध्य प्रदेशात 7 एप्रिल रोजीच दीनदयाल अंत्योदय भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. येथे 5 रूपयात जेवण उपलब्ध केले जात आहे. मोठ्या शहरात कामानिमित्त येणारे कामगार व गरिबांना जेवण मिळावे या हेतून ही भोजनालये सुरू करण्यात आली आहेत.