फटाके फोडण्याच्या वादातून जळगावातील तांबापूरात तरुणाचा खून : चॉपर हल्ल्यात तिघे जखमी

Criminals salute new SP in Jalgaon : Gang killed youth, injured three जळगाव : जळगाव आणि गुन्हेगारी हे समीकरण बनले असून जिल्ह्यात नूतन अधीक्षकांनी पदभार घेवून 24 तास उलटत नाही तोच गुन्हेगारांनी नूतन अधीक्षक एम.राजकुमार यांना जोरदार सलामी दिली. तांबापुरा परीसरात टोळक्याने हल्ला केल्याने तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. या घटनेने तांबापुरा भागात ऐन दिवाळीत तणावपूर्व शांतता पसरली आहे. संजयसिंग प्रदीपसिंग टाक (20) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

फटाके फोडण्याचा वाद बेतला जीवावर
मयताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तांबापुरा परीसरातील सिकलकर वाडा भागात राहणार्‍या संजयसिंग प्रदीपसिंग टाक या तरुणाचा सोमवारी रात्री फटाके फोडण्यावरून मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांच्यासोबत वाद झाला होता.

अचानक चढवला चॉपरने हल्ला
मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास संजयसिंग हा घराबाहेर क्रिकेटच्या गप्पा करीत असताना मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांनी त्याच्यावर चॉपरने हल्ला केला. संजयसिंग याला वाचविण्यासाठी त्याचे वडील प्रदीपसिंग टाक, भाऊ करणसिंग टाक, काका बलवंतसिंग टाक, गल्लीतील व्यक्ती बग्गासिंग टाक यांनी धाव घेतली असता त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आल्याने तेदेखील जखमी झाले.

दोन संशयीत ताब्यात
घटनास्थळी दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक झाल्याची माहिती आहे. मयत आणि जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असून मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने परीसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयीत फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील हे ताफ्यासह दाखल झाले आहे. दरम्यान, गुन्हेगारांनी नूतन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना दिलेल्या जोरदार सलामीची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.