धुळे । दिपावली सणानिमित्त किरकोळ फटाका विक्रीचे तात्पुरते परवाने मंजूर करण्यास जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुरवात झाली आहे. संबंधितांनी १० ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.अरविंद अंतुर्लीकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. डॉ.अंतुर्लीकर यांनी म्हटले आहे, मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही महानगरपालिका, पोलिस अधीक्षक यांचे कार्यालयाकडून मंजुरी दिलेल्या ठिकाणी तात्पुरते फटाका दुकान लावण्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. शहरातील फटाके विक्रेत्यांनी मनपा क्षेत्रात आयुक्त, पोलिस अधिकारी यांच्याकडून जागा निश्चित करुन फटाका विक्री करणेकामी ना हरकत पत्र प्राप्त करुन घेवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.