सर्वजण मिळून ध्वनी प्रदूषण नियंत्रणात आणू
प्रदुषाबद्दल इसिएकडून होत आहे जनजागृती
पिंपरी : गणेशोत्सवामध्ये सर्वाधिक प्रमाणात नागरिकांनी सहकार्य केले आहे. सर्व जण पर्यावरणाच्या संवर्धनाच्या कार्यात पुढाकार घेवून आपले शहर माणसांना व सजीवांना राहण्यास योग्य बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाले होते. खरे पाहता हा बदल आपणच आपल्या नित्याच्या सवयी बदलून घडवून आणला आहे याचे सर्व श्रेय शहरातील सर्व नागरिकांना व त्यांच्या विविध समूहांना जात आहे. मग त्यात प्रशासन व शासकीय यंत्रणा आणि राजकीय शक्तीचा विसर सुद्धा होता कामा नये. चार-पाच वर्षापूर्वी ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण अतिशय प्रचंड होते, पण त्या तुलनेत ते गतीने पुढे वाढलेले नाही ही जमेची बाजू आहे. जरी शहराची प्रगती प्रचंड होत असली तरी मग हे सर्व कसे झाले? त्यासाठी कोणीतरी नागरिकांची मानसिकता बदलण्याचे कार्य हाती घेतले आहे. आज आपल्या शहरातील प्रत्येक नागरिक या बाबतीत जागरूक झालेला दिसून येतोय म्हणून आम्ही हे सर्व श्रेय नागरिकाना देण्यातच धन्यता मानतो.
हे देखील वाचा
फटाक्यांचा होतो त्रास
प्रत्येक सणासुदीला आपण मोठ्या आवाजाचे फटके वाजवतो व मनातील आनंद व्यक्त करतो. पण त्या फटाक्याचा आवाज इतरांना म्हणजे शेजार-पाजारच्या नागरिकांना, सजीवांना किती त्रासदायक होतो याचा कधीच विचार करीत नाही. मच्छिमारी करणारे कोळी पाण्याच्या डोहात मोठा स्फोट घडवून आणतात. त्या प्रचंड आवाजाने त्या परिसरातील मासे मरतात आणि पाण्यावर तरंगू लागतात. मग त्या मृत माश्यांना जमा करून विक्रीसाठी बाजारात आणले जाते. लक्षात घ्या जर आवाजाने मासे मरतात तर तोच परिणाम आपल्या हृदयावर सुद्धा होतो असणार फक्त फरक एवढाच कि आपले हृदय माश्याच्या हृदया पेक्षा बर्यापैकी सक्षम असल्याने आपण मरत नाही पण मरणाच्या वेदना सहन कराव्याच लागतातच. फटाके वाजविणारे अचानक फटके वाजवितात. त्यामुळे पाळण्यात झोपलेली लहान बाळे आणि शरीर थकले म्हणून विश्रांती घेणारे जेष्ठ नागरिक यांना फार मोठा झटका बसतो. त्याचे परिणाम त्या निरपराध मंडळीना भोगावे लागतात.
काय केले पाहिजे
कोणत्याही सणाला मोठ्या आवाजाचे फटाके विकत घेणे टाळले पाहिजे. लाऊड स्पीकरचा आवाज गरजे पुरताच असावा. पारंपरिक वाद्यांचा वापर समारंभातूनच करावा. इसिए ही संस्था मागील अनेक वर्षांपासून शहरातील सर्व शाळा विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक दिवाळी (फटाके मुक्त दसरा, दिवाळी), पर्यावरण पूरक गणेशोत्सव आदी विषयांवर प्रबोधन आणि जनजागृती करीत आहे. त्यापासून खूप मोठी क्रांती ह्या शहरात घडताना दिसत आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थी सामुहिक शपथ, निबंध आणि चित्रकला या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहेत. यामुळे सणासुदीला बाहेर शहरातून अथवा परगावातून शहरात आलेल्या पाहुण्यांना यातील बदल स्पष्ट जाणवतो आणि ते कौतुकसुद्धा करतात. पर्यावरण पूरक आकाश कंदील बनविण्याची स्पर्धा आयोजित करणार आहोत. आपण सर्वांनी जर ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतःच्या घरापासून सुरवात केली तर, आपण समाजावर आलेले आजचे संकट दूर होण्यास सहकार्य होईल. सामजिक आरोग्य संवर्धनसाठी सहभागी होऊ शकता.