फटाक्यांच्या आतषबाजीत तिघे भाजले

0

कुरुळी यात्रेतील घटना ; एकाची प्रकृती चिंताजनक

चाकण : कुरुळी (ता.खेड) येथील यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत तीन जण भाजून जखमी झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.8) रात्री अकरा वाजनेचे सुमारास घडली आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. यातील जखमींना उपचारासाठी पुणे , पिंपरी येथील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे दतात्रेय जाधव यांनी दिली.

सय्यद करीम अब्दुल रहेमान ( वय 55) अजय महागडे ( वय 30 दोघेही रा. मुगलपुरा , ता. संगमनेर, जि. अहमदनगर) व रितेश विशाल डोंगरे ( वय 20 ) अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील अजय महागडे यांची प्रकृती चिंताजनक असून ते सुमारे साथ टक्के भाजल्याची माहिती प्राप्त होत आहे. या बाबतचे वृत्त असे कि, कुरुळी ( ता. खेड) यात्रेनिमित्त गावच्या भैरवनाथ महाराज ग्रामदैवताच्या पुजेनंतर रात्री गावात फटाक्याची आतीषबाजीचे आयोजन करण्यात आले होते. या फटाक्याच्या आतीबाजीसाठी संगमनेर (जि. अहमदनगर) येथील शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण करणारे लोक बोलावण्यात आले होते. गावातील नागरिकांनीही यात मोठ्या संखेने सहभाग घेतला होता. गावातील फटाक्याच्या आतिषबाजीचा खेळ रंगत असताना रात्री अकरा वाजताच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी सुरु असताना एक फटाका खोलून ठेवण्यात आला होता, व त्या शेजारी असलेला एक फटाका आतषबाजीसाठी पेटविण्यात आल्या. जवळील खोलून ठेवलेल्या फटाक्यावर त्याची ठिणगी पडली आणि त्याशेजारी असलेल्या तिघांना या आगीची झळ लागली. गावातील ग्रामस्थांनी जखमींना त्वरित रुग्णवाहिकेतून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठविले आहे. रात्री उशिरा पर्यंत यातील जखमींचे जबाब रुग्णालयात जाऊन नोंदवून घेण्याची कार्यवाही चाकण पोलिसांकडून सुरु होती.