फडणवीसांची इतिहासात उत्तम विरोधी पक्षनेता म्हणून नोंद होईल: संजय राऊत

0

मुंबई: सरकारवर अंकुश ठेवण्यात विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्त्वाची असते ती भूमिका माजी मुख्यमंत्री विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उत्तमरित्या निभावत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची उत्तम विरोधी पक्षनेते म्हणून इतिहासात नोंद होईल असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची फडणवीस यांच्याबाबतची भूमिका मवाळ झाल्याची चर्चा आहे. यावरूनच राजकारणात वेगळे संकेत तर नाही ना? असा प्रश्न माध्यमांनी खासदार राऊत यांना केला, यावर प्रतिक्रिया देतांना त्यांनी फडणवीसांबाबत विधान केले. यापूर्वी संजय राऊत यांनी लवकरच देवेंद्र फडणवीस यांचीही मुलाखत घेणार असल्याचे सांगितले होते.

उद्या पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेचे संबंध ताणले गेले. शिवसेनेने भाजपापासून फारकत घेत कॉंगेस, राष्ट्रवादीची साथ घेतली. उद्या ठाकरे-फडणवीस एकत्र येणार असल्याने काय घडणार? याकडे लक्ष लागले आहे.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उत्तम समन्वय असल्याचेही सांगितले. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते गळचेपी करत असल्याचे आरोप करत काल मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला. परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात राष्ट्रवादीकडून गळचेपी सुरु असल्याचे आरोप खासदार संजय जाधव यांनी केला होता. यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. मात्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिम आणि मंदिरे सुरु करण्याबाबत निर्णय होऊ शकतो असा सुतोवाचही संजय राऊत यांनी केला आहे.