फडणवीस आत्मनिग्रह हरवून बसले; ‘फ्री काश्मीर’वरून जयंत पाटीलांची टीका !

0

मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांनी स्वतंत्र काश्मीरची मागणी केली. यावर भाजपने सरकारवर विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या नाकाखाली लागणारे ‘फ्री काश्मीर’चे फलक कसे खपवून घेतात? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले. दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘देवेंद्रजी, ‘काश्मीर मुक्त करा’ याचा अर्थ काश्मीर भेदभावापासून, नेटवर्कवरील बंदीपासून आणि केंद्रीय अंकुशापासून मुक्त करा. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून तिरस्कार निर्माण करत आहेत, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, यावर माझा विश्वासच बसत नाही. सत्ता गमावल्यामुळे हे होत आहे की तुम्ही आत्मनिग्रह हरवून बसला आहात?’ असा प्रतिप्रश्न जयंत पाटलांनी केला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेचा फोटो रिट्वीट करत लिहिलं, “हे आंदोलन नक्की कुणासाठी आहे? ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा इथे का दिल्या जात आहेत? मुंबईत अशा प्रकारच्या फुटीरतावादी घटकांना आपण कसं सहन करु शकतो? मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आझादी गटाकडून ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा कशा दिल्या जातात? उद्धवजी तुमच्या नाकाखाली अशाप्रकारे फ्री काश्मीरची भारतविरोधी मोहीम सुरु आहे, हे तुम्ही खपवून घेणार का?” असा प्रश्न फडणवीसांनी विचारला होता.