मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना वेग आले आहे. उद्या बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपची कसोटी लागणार आहे. दरम्यान भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही बहुमत सिद्ध करू यात काही शंका नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील उद्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पराभव होईल असा दावा केला आहे. नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस नसल्याने उद्या शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष आणि अपक्ष आमदार फडणवीस सरकार घालवतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीतर्फे व्हीप कोणाचा लागू होईल हा प्रश्न सध्या अधिक चर्चेचा आहे. यावर हंगामी अध्यक्षच निर्णय घेणार आहे.
फडणवीस यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केले आहे. आमच्याकडे १७१ आमदारांची संख्या आहे असा दावा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे बहुमत नसल्याने फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक बोलविण्यात आली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षावर दाखल झाले आहे. त्याठिकाणी भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे.