फडणवीस दिल्लीत गेल्यावर हे पत्र समोर आले

खा. शरद पवार यांचे ‘त्या’ लेटरबॉम्बवर भाष्य

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटत असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर भाष्य करत भूमिका मांडली. देवेद्र फडणवीस दिल्लीत आल्यानंतर हे पत्र समोर आलं आहे. त्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नाही. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत, असं पवार म्हणाले. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राविषयी बोलताना शरद पवार म्हणाले,परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. परमबीर सिंग मलाही भेटले होते. पण, त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणं मांडलं होतं. त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असेही ते म्हणाले.