फडणवीस पुन्हा बचावले!

0

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हेलिकॉप्टरने हवाई प्रवास काही धार्जिणा दिसत नाही. लातूरमधील निलंगा येथे हेलिकॉप्टर कोसळून ते थोडक्यात सुखरुप बचावले होते. ही घटना ताजी असतानाच, शुक्रवारी फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अलिबाग येथे अपघात झाला. मुख्यमंत्री बसण्यापूर्वीच हेलिकॉप्टरने उड्डाण भरले. त्यामुळे हेलिकॉप्टरचा पंखा मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला लागणार इतक्यात सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने फडणवीस वाचू शकले. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री सचिवालयाने पत्रक काढून असे काही घडले नसल्याचे सांगितले असले तरी, प्रत्यक्षदर्शींनी मात्र या अपघाताबद्दल माहिती दिली. तसेच, घटनेच्यावेळी सर्वांच्या काळजाचा ठोकाही चुकला होता, असे सांगितले.

सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे बचावले
अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याअंती डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी 1.55 वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टरमध्ये बसण्याकरीता चढत असतानाच, हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षारक्षक व पोलिस अधिकार्‍यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले. फडणवीस अलिबागला एका कार्यक्रमासाठी गेले होते. पेण येथील वडखळजवळ जेएसडब्ल्यूच्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पेणला आले. तेथून हेलिकॉप्टरने ते मुंबईला येणार होते. ते हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी पुढे आले तोच अचानक हेलिकॉप्टर उड्डाण घेत असल्याचे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. सतर्क असलेल्या सुरक्षारक्षकाने फडणवीस यांना लगेच बाजूला केले. सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानतेमुळे मुख्यमंत्री अपघातातून बचावले. दरम्यान, अपघाताच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाने केले होते.

संबंधितांची चौकशी सुरु
रायगडचे जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर पुन्हा लॅण्ड करण्यात आले. त्याच्या पंख्यांची चाचणी घेतली गेली. त्यानंतर मुख्यमंत्री त्याच हेलिकॉप्टरने मुंबईला गेले. मुख्यमंत्री ’वर्षा’वर सुखरुप पोहोचले असून, या घटनेची दखल घेऊन, राज्य सरकारच्या हवाई वाहतूक संचालकांनी संबंधितांना चौकशीसाठी बोलावले होते. याआधी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला 25 मेरोजी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे अपघात झाला होता. टेक ऑफ घेतल्यानंतर हेलिकॉप्टर काही क्षणातच कोसळले होते. उड्डाणानंतर काही सेकंदातच हेलिकॉप्टर खाली आली होते आणि विजेच्या खांबावर आदळून कोसळले होते. त्यातून फडणवीस आणि काही अधिकारी थोडक्यात बचावले होते.