जळगाव:विधानसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. गिरीश महाजन यांच्यामुळेच माझे तिकीट कापण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना केला. दरम्यान, खडसेंनी प्रथमच थेट नाव घेऊन आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे भाजपावर नाराज आहे. ही नाराजी त्यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमांमधून व्यक्त केली होती. तसेच विधानसभा निवडणुकीतही एकनाथराव खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत अॅड. रोहिणी खडसे पराभूत झाल्या. या पराभवानंतर एकनाथराव खडसे यांनी पक्षाध्यक्षांकडे पुराव्यासह तक्रारी केल्या. या तक्रारीनंतर माध्यमांशी बोलतांना खडसे यांनी प्रथमच आपली उमेदवारी कापण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. गिरीश महाजन यांचाच हात असल्याचा आरोप केला. तसेच उमेदवारीसाठी आपल्या नावाला फडणवीस आणि महाजन यांनी नाराजी दर्शविल्याची माहिती कोअर कमेटीतील सदस्याने आपल्याला दिल्याचेही त्यांनी सांगितले. खडसेंनी थेट नाव घेऊन आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष आता काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
खडसेंकडे चुकीची माहिती: आ. महाजन
भाजपाच्या कोअर कमिटीत ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या नावाला कुणीही विरोध केला नाही किंवा चर्चाही झाली नाही. त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली. चुकीच्या माहितीच्या आधारावर आरोप करणे योग्य नाही. मी स्वत: नाथाभाऊंशी बोलणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना देखील उमेदवारी मिळाली नाही. हा निर्णय केंद्रीय समितीचा आहे. आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. त्यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी होऊन एकदाचा सोक्षमोक्ष व्हायला हवा, अशी प्रतिक्रीया माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी दिली.