औरंगाबाद । मराठा क्रांती मोर्चामधून करण्यात आलेल्या मागण्यासंदर्भात कोणतेही ठोस निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या राज्य सरकार व पक्षाने घेतले नाहीत. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षणाचे केवळ गाजरच दाखवले आहे. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजानेही मतदानातून मुख्यमंत्र्यांना गाजर दाखवावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, मंत्री विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, मुंबईचे शहराध्यक्ष आशीष शेलार यांनी मराठा क्रांती मोर्चामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला असून, त्यांना समाजाने मतदानातून हिसका दाखवावा, असेही समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
मराठा समाजाची खिल्ली उडविण्याचे काम सरकारने केले
मराठा क्रांती मोर्चाच्या आकाशवाणी चौकातील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी जाहीर निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. गुरुवारी (दि.16) जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान होत आहे. मराठा समाजाच्या मतदारांना या माध्यमातून आवाहन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्यासंदर्भात कोणतेही ठोस निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या राज्य सरकार व पक्षाने घेतलेले नाही. मराठा आंदोलन कसे शांत होईल, मराठा समाज व कार्यकर्त्यांचे कसे खच्चीकरण करता येईल यासाठी पराकोटीचा खेळ सत्ताधारी राज्य खेळत आला आहे. अनेक मराठा मोर्चे निघूनही मोर्चाचा काहीही परिणाम झालेला नाही, मुख्यमंत्री हे मागच्या काही निवडणुकीच्या प्रचारामध्ये छाती ठोकपणे सांगत होते. ही मराठा समाजाची खिल्ली उडविण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. ज्या मागण्यांसाठी हे मोर्चे काढण्यात आले. त्या मागण्या पूर्ण केल्या नाही. गेल्या 6 महिन्यापासून राज्य सरकारने झुलवत ठेवले असून मराठा समाजाची अवहेलना केल्याचा जाहीर निषेध समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात हिंसक आंदोलन छेडणार
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीमध्ये येवून भाजपच्या नेत्यांनी राजन घाग यांना मुंबई महापालिकेत पक्षाचे तिकीट दिले. समाजामध्ये फुट पाडणे हाच यामागे उद्देश होता. भाजपमधील काही नेते फुट पाडण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहेत. परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत फुटीच्या प्रयत्नांना झुगारून आम्ही लढत राहू असा निर्धार समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणा देणार्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी फोटो काढून घ्या आणि बाजूला बसा असे म्हणून मराठा समाजाची खिल्ली उडवली. या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी, नसता यापुढे मुख्यमंत्र्यांच्या सभेत व कार्यक्रमात हिंसक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी दिला.
मुंबईतील 6 मार्चचा मोर्चा घोषणाबाजीने दणाणणार
मराठा क्रांती मोर्चाने कुठलीही आयोजक समिती नेमलेली नाही, मुंबईतील मोर्चाच्या आयोजनासाठी 8 दिवसात राज्यव्यापी बैठक घेण्यात येईल, समाजातील सर्वसामान्य मराठा हा आयोजक आहे. 6 मार्च रोजी मुंबईत काढण्यात येणारा मोर्चा हा मूक मोर्चा असणार नाही तर बोलका मोर्चा राहणार आहे. सरकारविरुद्ध घोषणाबाजी करून मुंबई दणाणून सोडू असेही समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी जाहीर केले.