मुंबई – जनतेच्या हिताचा निर्णय घेताना सनदी अधिकारी ऐकत नसल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. मात्र अद्याप अधिकार्यांची ही मुजोरी कमी झाल्याचे दिसत नााही. कारण अजूनही अनेक खात्यांमधील अधिकार्यांच्या वागण्यात बदल झाला नसून मंत्र्यांचे कोणतेच म्हणणे ऐकायचे नाही या भूमिकेवर अधिकारी ठाम आहेत. त्याचाच फटका सामाजिक न्याय विभागाला बसत असून सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि याच विभागाचे प्रधान सचिव सुरेंद्रकुमार बागडे यांच्यात विसंवाद निर्माण झाल्याने तो काही केल्या मिटेना, अशी माहिती सामाजिक न्याय विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मंत्री राजकुमार बडोले यांनी अनेकवेळा विभागाचे प्रधान सचिव यांना आदेश देत असतात. मात्र यातील अनेक आदेश हे सचिवांनी पाळले जात नाहीत. त्यामुळे महत्वाच्या विषयांसंबधी ही अध्यादेश काढण्यात विलंब होत असल्याची चर्चा सामाजिक न्याय विभागात होत आहे. याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे 14 एप्रिल हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस असल्याने हा दिवस ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती.
त्याअनुषंगाने तसा प्रस्ताव तयार करून अध्यादेशही काढण्याचे आदेश त्यांनी संबिधत अधिकार्यांना दिले. मात्र त्यास विभागाचे सचिवांनी मोडता पाय घालत याविषयीचा प्रस्ताव तयार केला नाही. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिवस जवळ आला तरी त्या विषयीचा प्रस्ताव तयार झाला नसल्याचे कळताच मंत्री बडोले यांनी थेट उपसचिवांना फोन करत त्याविषयीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. शेवटी 12 आणि 13 एप्रिल 2017 रोजी त्याविषयीचा प्रस्ताव तयार करून या विषयीचा अध्यादेश तातडीने संध्याकाळी सामाजिक न्याय विभागाने प्रसिध्द केला. त्यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांकडून सातत्याने माहिती घेवून 14 एप्रिलच्या आधीच त्याविषयीची अधिसूचना प्रसिध्द करण्याविषयीचा तगादा लावल्याचे त्यांनी सांगितले. याच अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाची अनेक कामे मंत्र्यांच्या सूचनेनुसार होत नाहीत. त्यामुळे मंत्री बडोले यांना काम करणे अवघड बनल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीचे प्रधान सचिव उज्ज्वल उके यांचेही मंत्री राजकुमार बडोले यांच्याशी फारसे चांगले संबध नव्हते. त्यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांची बदली करावी लागली. आता पुन्हा तीच तर्हा सध्याच्या विद्यमान सचिवांकडून होत असल्याने त्याचा परिणाम विभागाच्या कारभारावर होत असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले..