पुणे । घोडनदी किनारी असणारे ऐतिहासिक फत्तेश्वर मंदिर आणि परीसर, निघोज-टाकळी हाजी कुंड पर्यटनस्थळाप्रमाणे पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. शनिवारी शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, सुभाष ऊमाप, सुनिता गावडे, स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, अरुणा घोडे, प्रदीप वळसे पाटील, अॅड. रंगनाथ थोरात आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
ऐतिहासिक पांडवकालीन फत्तेश्वर मंदीर परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होण्यासारखा भाग आहे. मतदार संघात 33 कोटी रुपयांच्यावर निधींची रस्त्यांची कामे मंजूर झालेली आहेत. त्यातील जास्त निधी हा शिरुरमधील 42 गावांच्या रस्त्यांसाठी वापरण्यात येणार आहे. मलठण, पाबळ आणि तळेघरला नवीन आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहे. 1 कोटी 17 लाख एवढा आमदार निधी व्यायाम साहित्य खरेदीसाठी वापरण्याचा निर्णय घेतल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
प्रस्ताव सरकार दरबारी
फत्तेश्वर मंदीर परिसर पर्यटन केंद्र होण्यासाठी तयार होणारा प्रस्ताव सरकार दरबारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्याचे काम करू. तसेच या सर्व परिसराच्या विकासासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी दिले. सूत्रसंचालन रामदास ईचके, रविंद्र गायकवाड यांनी आभार मानले.
विकासात्मक कामांना गती
प्रदीर्घकाळ अफाट मेहनत घेऊन सर्वांगीण विकास केल्यानेच आज महाराष्ट्रात वळसे पाटील यांनी सामाजिक अणि राजकीय क्षेत्रात खूप मोठी उंची गाठली आहे. जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष पदावर विवेक वळसे-पाटील यांच्या रुपाने एक हक्काचा माणूस या परिसरातील सदस्यांना मिळाल्याने विकासात्मक कामे करण्यास निश्चितच गती मिळणार असल्याचे माजी आमदार पोपपटराव गावडे यांनी सांगितले.