फरकांडे गावातील कापूस व्यापार्‍याची निर्घृण हत्या : मुख्यालयातील पोलिसांसह पाच आरोपी जाळ्यात

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची पत्रकार परीषदेत माहिती

जळगाव/भुसावळ : पाळधी गावाजवळ फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची शुक्रवारी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येतील पाच आरोपींच्या जळगाव गुन्हे शाखेने आवळल्या असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे सोमवारी दुपारी पत्रकार परीषदेत दिली. दरम्यान, कन्नड घाटात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या स्टींगनंतर चार लाचखोर पोलिसांचे निलंबन केल्यानंतर पोलीस दलाची बदनामी झाली असताना आता खून प्रकरणात पोलिसाचे नाव पुढे आल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

तपासामुळे नावे केली नाहीत उघड
जळगाव येथून काही लाखांची रक्कम घेवून एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी व दिलीप चौधरी हे कारने गावाकडै निघाले असतानाच पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून शिंपी यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पाच आरोपींपैकी एक आरोपी पोलीस कर्मचारी असल्याची खळबळजनक माहिती सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी त्यांच्या दालनातील पत्रकार परीषदेत दिल्याने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याच्या तपासावर परीणाम होऊ नये म्हणून आरोपींची नाव पोलीस अधीक्षकांनी यावेळी जाहीर केली नसल्याचे सांगत ओळख परेडसाठी थेट पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडी घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

अशी घडली घटना
एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी (27, रा.फरकांडे, ता.एरंडोल) व दिलीप चौधरी हे जळगाव येथे कापूस व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी आल्यानंतर परतीच्या प्रवासात होंडासिटी कारने गावाकडे निघाले असतानाच शुक्रवारी रात्री आठ वाजता पाळधी पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच संशयीतांनी चाकूचे सपासप वार करून शिंपी यांची हत्या केली होती. सुरूवातीला या प्रकरणात शिंपी सोबत राहणारा सहकारी दिलीप चौधरी याच्यावरही संशय व्यक्त केला होता मात्र जळगाव गुन्हे शाखेने चारही बाजूचा अभ्यास केल्यानंतर या हत्येचा उलगडा केला आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचार्‍यासह चार संशयीतांना पथकाने अटक केली आहे. यातील काही संशयीत पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगााव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व सहकार्‍यांनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास करीत मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजसह खबर्‍यांचा नेटवर्कचा प्रभावी वापर करून गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले आहे. पाचही अटकेतील आरोपींना धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.