एरंडोल – तालुक्यातील फरकांडे ते लोणी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार डॉ.सतीश पाटील यांचे हस्ते करण्यात आले. रस्त्याचे काम लवकर व चांगल्या दर्जाचे करण्याच्या सूचना आमदार डॉ.पाटील यांनी ठेकेदारास यावेळी दिली. फरकांडे-लोणी रस्त्याच्या कामासाठी अनेक दिवसांपासुन खडी टाकण्यात आली होती. मात्र काम सुरु न झाल्यामुळे सर्व खडी रस्त्यावर विखरून पडली होती. त्यामुळे यामार्गावरील कासोदा ते पारोळा ही बससेवा अनेक दिवसांपासुन बंद करण्यात आली होती. बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. फरकांडे व परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दयनीय अवस्थेबद्दल आमदार डॉ.पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. आमदार यांनी तक्रारीची त्वरित दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकार्यांची कान उघडणी करून तत्काळ या रस्त्याचे काम सुरु करण्याची सूचना करून कामाचे भूमिपूजन केले.
फरकाडेपर्यंतच्या बससेवा पुर्ववत सुरूच्या सुचना
आमदार डॉ.पाटील यांनी एरंडोल येथील परिवहन महामंडळाचे आगार प्रमुखांशी संपर्क साधुन फरकांडेपर्यंत बससेवा पूर्ववत सुरु करण्याची सूचना केली. फरकांडे ते लोणी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावरून पायी चालतांना देखील अनेक अडचणी येत होत्या. दुचाकी चालक व अवजड वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत होती. रस्त्याच्या कामासाठी एक महिन्यांपासून खडी टाकण्यात आली होती. मात्र काम करण्यास संबधित ठेकेदाराकडून टाळाटाळ करण्यात येत होती. आमदार डॉ.पाटील यांनी रस्त्याच्या समस्येची त्वरित दखल घेतल्या बद्दल फरकांडे ग्रामपंचायततर्फे सरपंचा किरण पाटील, माजी सरपंच रोहिदास पाटील, जयश्री ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी परिसरातील ग्रामस्थ,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी मतदारसंघात विकास कामे करतांना कोणताही भेद भाव न करता सर्वांना समान न्याय देत असल्याचे सांगितले.