फरार आरोपीस नेहरुनगरमधून अटक

0

पिंपरी : एका इसमावर चार जणांच्या टोळक्यांनी कोयत्याने वार करुन त्याच्याजवळील रोख चार लाख रुपयांनी भरलेली बॅग जबरदस्तीने हिसका मारुन चोरु नेली होती. ही घटना 27 जानेवारी 2015 मध्ये भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील केएसबी चौक टेल्कोरोड येथे घडली होती. या घटनेतील तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र या गुन्ह्यातील एक आरोपी चार वर्षांपासून फरार होता. टिल्लु उर्फ मुजाहीद इब्राहीम औटी (वय 25, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक भोसरी पोलीस ठाणे हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत होते. यावेळी पोलीस शिपाई सुनिल चौधरी यांना त्यांच्या खबर्‍याकडून माहिती मिळाली कि, जबरी चोरी प्रकरणातील आरोपी टिल्लु औटी हा नेहरुनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडियमजवळ येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून टिल्लु याला अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी या आगोदरच रिंकू उर्फ अमर कुलवंतसिंग चौहान (रा. नेहरुनगर), रहीम नईम चौधरी (रा. शाहुनगर, चिंचवड) आणि प्रशांत पवनसिंग ठाकुर (रा. काळेवाडी) या तिघांना अटक केली होती. गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने आरोपी टिल्लु याला भोसरी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.