कल्याण : कल्याणमधील आधारवाडी कारागृहातून पळलेल्या दोन कैद्यांची गंभीर घेत तुरुंग अधीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी घेतली आहे. त्यांनी सोमवारी आधारवाडी कारागृहाला भेट दिली आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्याचे आदेश तुरुंग अधीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी सोमवारी दिले. रविवारी पहाटेच्या सुमारास दोन कैद्यांनी कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून पळ काढल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच तुरुंग प्रशासनाने स्थानिक पोलिसाच्या मदतीने नाकाबंदी केली. खडकपाडा पोलिसांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला असून आरोपींची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. अजूनही आरोपीचा माग पोलिसांनी लागू शकलेला नाही.
कारागृहात नाहीत पुरेसे बरॅक
आधारवाडी कारागृहाची कैदी ठेवण्याची क्षमता 540 इतकी असताना कच्चे कैदी, महिला कैदी आणि त्यांची मुले असे जवळपास 1600 कैदी दाटीवाटीने कोंबण्यात आले आहे. या कैद्यांना झोपण्यासाठी देखील जागा नसल्यामुळे कारागृह प्रशासनावर भार पडण्या बरोबरच कैद्यामधील वाद देखील वाढत आहेत. तर दुसरीकडे जामिनावर सुटणार्या किंवा शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर पडणार्या कैद्याची संख्या अल्प असल्यामुळे तुरुंगातील कैद्यांची संख्या दिवसाला वाढत आहे. यामुळेच तुरुंगधिकार्यांना या तुरुंगातील प्रशासन सांभाळणे अवघड बनले आहे. यामुळे नव्या कैद्यांना आधारवाडी कारागृहात पाठवू नये या कारागृह प्रशासनाच्या विनंती केल्यानंतर काही दिवस या कारागृहात नवे कैदी पाठविले जात नव्हते. मात्र महिना भराच्या कालावधीनंतर पुन्हा कारागृहात कैद्याची रवानगी केली जात असून कारागृहात पुरेसे बरॅक नसल्यामुळे या कारागृहात अक्षरश: कैद्यांना कोंबले जाते.
सुरक्षा यंत्रणेवर ताण
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे पोलीस यांची सांगड घालता एका कर्मचार्यांना 35 ते 40 कैद्यावर नजर ठेवावी लागते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहातील कैद्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले आहे. या सीसीटीव्हीचा डीसप्ले जेल अधीक्षकाच्या केबिनमध्ये बसविण्यात आला असून यात कैद्याची हालचाल नियमित टिपली जात असली तरी सकाळच्या वेळी अधीक्षकांनी केबिनचा ताबा घेईपर्यत या फुटेजकडे कोणीही ढुंकूनसुद्धा पाहत नसल्याचा फायदा घेत आरोपींनी पळण्यासाठी सकाळची वेळ निवडल्याचे बोलले जात आहे. यामुळेच वरिष्ठाच्या अनुपस्थितीत जबाबदारी असणार्या कर्मचार्यांनी यावर लक्ष ठेवले असते तर या आरोपीना ही संधी मिळालीच नसती यासारख्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कैद्यांनी काढला फिल्मी स्टाईलने पळ
मणी शंकर नाडर आणि डेव्हिड देवेंद्रन हे दोन कैदी आधारवाडी कारागृहातून पसार झाले. त्यानंतर त्यांनी थेट कोण गाव गाठत तेथे एक इसमाला मारहाण करत त्याच्याजवळील दुचाकी हिसकावून घेत तेथून पळ काढल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली. त्यानंतर त्यांनी दुचाकीने थेट पनवेल गाठले. रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पनवेलला पोहचल्यानंतर एक चारचाकी गॅरेज मालकाला मारहाण करत त्यांच्याजवळून एका स्कोडा गाडीची चावी हिसकावून घेतली. दुचाकी तेथेच टाकून हे दोघे या गाडीने ते तेथून पळून गेले. घडल्या प्रकरानंतर गॅरेज मालकाने पनवेल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. यादरम्यान पळालेल्या कैद्यांचा फोटो सर्व पोलीस स्थानकात धाडण्यात आले होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी शहानिशा करण्यासाठी सदर फोटो तक्रारदाराला दाखवला. त्याने फोटो पाहताच तेच कैदी असल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले. या दोन्ही कैद्यांनी गेल्या 24 तासात दोन चोर्या केल्या असून याप्रकरणी कोनगाव पोलीस स्थानकात बाइकचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पनवेल पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कैद्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके धाडली असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.