फरार गुंडाला हडपसरमधून अटक

0

हडपसर । खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे करणार्‍या व हडपसर येथील एका गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुंडाला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत. टिपू उर्फ रिजवान सत्तार पठाण (वय 26, रा. हडपसर) असे त्याचे नाव आहे.

हडपसरमध्ये 7 जुलै रोजी टिपू उर्फ रिजवान पठाण याने आकाश उर्फ बाळा मनोहर माकर (वय 23, रा. हडपसर), साहिल इलाही शेख यांच्या मदतीने पूर्ववैमनस्यातून संभाजी भोसले (वय 25, रा. हांडेवाडी) या तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून रिजवान पठाण फरार होता. दरम्यान खडक पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व अधिकारी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गस्त घालत असताना पठाण हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी जुन्या रामोशी गेट पोलिस चौकीजवळ येणार असल्याची माहिती कर्मचारी गणेश माळी व आशिष चव्हाण यांना बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबूल केले. तसेच पठाणला शहर व हडपसर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढण्यात आला होता. मात्र त्याने या आदेशाचा भंग केला.