निगडी : मारहाणीच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपासून फरार असलेल्या पिता-पुत्राला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. प्रकाश महादू रणदिवे (वय 43), सुरज प्रकाश रणदिवे (वय 22, दोघे रा. नंदनवन हाऊसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले पिता-पुत्र दोन महिन्यांपासून फरार होते. हे फरार आरोपी सुतारवाडी, घोटावडे फाटा येथे ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलीस नाईक फारूक मुल्ला यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा घोटावडे फाटा चौकात शोध घेतला. त्यावेळी प्रकाश रणदिवे पोलिसांना पाहून पळू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने निगडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक हर्षल कदम, सहाय्यक फौजदार संपत निकम, कर्मचारी धर्मराज आवटे, प्रवीण दळे, फारूक मुल्ला, जमीर तांबोळी, नितीन बहिरट यांच्या पथकाने केली.