फरार विजय मल्ल्याला अखेर भारतात आणता येणार!

0

नवी दिल्ली । भारतीय स्टेट बँक आणि सहकारी बँकेचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक असणारी परवानगी ब्रिटिश सरकारने दिली आहे. याबाबत ब्रिटिश न्यायालय लवकरच वारंट काढणार आहे, असे परराष्ट्र खात्याने सांगितले आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे, या आशयाची विनंती केली होती. भारताची प्रत्यार्पणाची विनंती त्यांनी मान्य केली असल्याचे परराष्ट्र खात्याने सांगितले आहे. गृहखात्याने परवानगी दिल्यानंतर त्यांनी भारताचा अर्ज स्थानिक न्यायालयाकडे पाठवण्यात आला आहे. मल्ल्याविरोधात वारंट काढण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. ती परवानगी मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर सहकारी बँकांचे 9,000 कोटी रुपये बुडवून विजय मल्ल्यांनी 2016 मध्ये ब्रिटनमध्ये पळ काढला. आयडीबीआयचे 720 कोटी रुपये बुडवल्याप्रकरणीदेखील विजय मल्ल्या विरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आले आहे.

फेब्रुवारी महिन्यातच स्वाधीन करावे असे दिले होते पत्र
फेब्रुवारी महिन्यात भारतीय परराष्ट्र मंत्रालयालाने ब्रिटन सरकारला मल्या यांना हद्दपार करून भारताच्या स्वाधीन करावे, असे पत्र पाठवले होते. मद्यसम्राट मल्ल्या यांच्याविरुद्ध हवाला व्यवहाराचाही आरोप आहे. मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स या बंद पडलेल्या कंपनीने 9400 कोटी रुपयांची बँकांची थकबाकी दिलेली नाही.

स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाइन्सने थकवले आहेत. 2 मार्च 2016 रोजी विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली – लंडन ‘9थ 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17 सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती. मात्र, विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती अ‍ॅटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.