डॉ. डी. वाय. पाटील हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग महाविद्यालयात आहारनियोजनावर कार्यशाळा
पिंपरी-चिंचवड : फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉरवर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील, असे मत निमाचे डॉ. राम गुडिला यांनी व्यक्त केले. ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग महाविद्यालयात हॉटेल व्यावसायिकांची जीवनशैली, आहार, रहाणीमान यातून निर्माण होणार्या आजारावर प्रतिबंध करण्यासाठी आहारनियोजन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत मर्चन्ट उपस्थित होते. या कार्यशाळेत डॉ. अवंती दामले, डॉ. विकास चोथे या आहारतज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आयोजक डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु पी. डी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ पाटील यांचे लाभले.
सलग 30 मिनिटे एका जागेवर बसू नका!
डॉ. राम गुडिला यांनी ‘जे आवडते तेच खा’ असा मूलमंत्र देत चौरस आहाराचे महत्त्व पटवून दिले. आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्याला समजली पाहिजे. आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने आपले वजन वाढते. त्यासाठी सलग 30 मिनिटे एका जागेवर बसू नका. वजन वाढते याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे लक्षात घ्या.
शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाही, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त 150 मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट नियोजन करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे, असेही ते म्हणाले.
डेझर्ट, पुडिंग आइस्क्रीम मर्यादितच हवे!
आहार नियोजनाविषयी डॉ. अवंती दामले म्हणाल्या, कोणतेही डेझर्ट, पुडिंग आइस्क्रीम हे अगदी मर्यादित असावे. म्हणजे हे पदार्थ अगदीच व्यर्ज्य नाहीत. पण वाढत्या कॅलरीजचा विचार करता जरा हात आखडताच ठेवला पाहिजे. हे शारीरिक व्यायामाशिवाय अपूर्ण आहे. म्हणूनच रोज किमान 30-40 मिनिटे चालणे, धावणे, पोहणे, मैदानी खेळ, योगासने, सूर्यनमस्कार असा व्यायाम करणे आवश्यक आहे. वजन कमी करणे किंवा आरोग्य संतुलित राहण्यासाठी तर्हेतर्हेचे आहार व पथ्यांबाबत सल्ले दिले जातात. डिटॉक्स डाएट, व्हेजिटेरियन डाएट, लो-फॅट डाएट असे अनेक प्रकार यामध्ये आहेत, पण त्यापासून फायदे किती होतात, हे निश्चित सांगता येत नाही. कारण ते प्रत्येकाला मानवतातच असे नाही, असेही त्या म्हणाल्या.