नारायणगाव । जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नारायणगाव येथे टोमॅटो प्रक्रिया उद्योग व फळभाजीपाला साठवणुकीसाठी शीतगृह उभारण्याचे आश्वासन सभापती संजय काळे यांनी दिले. वाढदिवसानिमित्त टोमॅटो उत्पादक शेतकरी, व्यापारी व आडतदार यांच्या वतीने काळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते उपबाजार आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक संतोष तांबे, प्रकाश ताजणे, सीताराम खिलारी, नाना घोडे, सचिव रूकारी, उपसरपंच जंगल कोल्हे, संतोष वाजगे, कार्यालयीन प्रमुख शरद घोंगडे, नारायणगाव सोसायटीचे अध्यक्ष आशिष फुलसुंदर, विपुल फुलसुंदर, टोमॅटो व्यापारी जालिंदर थोरवे, अर्जुन डुकरे, गुलाबशेठ डुकरे, मारूती वायाळ, दत्ता शिंगोटे, गणेश फुलसुंंदर, संदीप काफरे, राजेंद्र वाजगे आदी उपस्थित होते.
टोमॅटो उत्पादकांना दिलासा
फळभाजीपाला पिकांच्या घटलेल्या बाजारभावाचा फटका गेल्या वर्षभरात शेतकर्यांना बसला आहे. जुन्नर तालुक्यात कांदा, बटाटा, डाळिंब, टोमॅटो उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. बाजारभावाच्या अभावामुळे या वर्षी टोमॅटोचा उन्हाळी हंगाम वाया गेला. टोमॅटोच्या बाजारभावात आता वाढ होऊ लागली आहे. वाढलेल्या बाजारभावाचा फायदा पावसाळी हंगामातील टोमॅटो उत्पादकांना झाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे, असे काळे यांनी सांगितले.
पणन मंडळाकडे पाठपुरावा
नारायणगाव येथील उपबाजारात भाजीपाला बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारभाव घटल्यानंतर टोमॅटोचे होणारे नुकसान टाळण्यासाठी टोमॅटो प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. बाजार समितीच्या नारायणगाव येथील जागेत शीतगृह उभारणीसाठी पणन मंडळाकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी उपसभापती डुंबरे, संचालक तांबे यांनी मनोगत व्यक्त केले.