फळशेती शाश्‍वत होण्यासाठी फळ प्रक्रिया उद्योगाला चालना – मुख्यमंत्री

0

मुंबई । शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या फळांवर प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त प्रकल्प उभे केल्यास फळांना चांगला भाव मिळून शेतकर्‍यांना त्याचा आर्थिक लाभ मिळेल. फळशेती शाश्‍वत होण्यासाठी फळ प्रक्रिया उद्योगाला शासनामार्फत चालना दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. कोका कोला कंपनीच्या ‘मिनीट मेड संत्रा’ या संत्र्याचा पल्प वापरुन तयार करण्यात आलेल्या नवीन पेय उत्पादनाचा शुभारंभ (लाँचिंग) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृहात झाले.

मोसंबी आणि संत्रे हे राज्यात पिकविल्या जाणार्‍या महत्त्वपूर्ण फळांपैकी आहेत. त्यामुळे या फळांना शाश्‍वत बाजारभाव मिळाल्यास शेतकर्‍यांची उन्नती होऊन महाराष्ट्रातील शेतीचा आणि पर्यायाने राज्याचा चेहरामोहराच बदलण्यास चालना मिळेल. कोका कोला कंपनीने संत्रा फळावर प्रक्रिया करुन उत्पादित केलेल्या पेयामुळे शेतकर्‍यांना चांगला बाजारभाव मिळेल. कंपनीने हापूस आंब्यावर प्रक्रिया करुन पेये बनविण्याच्या कामास गती दिल्यास शेतकर्‍यांना लाभ होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

फळांचे एकत्रित गुण
अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक अनिल बी. जैन यांनी, जैन कंपनीने ब्राझिलीयन ऑरेंज हा नवीन वाण परदेशातून महाराष्ट्रात आणला व त्यावर संशोधन करुन स्वीट ऑरेंज हा नवीन वाण उत्पादित केला आहे, असे सांगितले. तसेच हा वाण संत्रा आणि मोसंबी या दोन्ही फळांचे एकत्रित गुण असलेला आहे.

शेतकर्‍यांना उत्पादनासाठी हा नवीन वाण देण्यात आला असून, याचे सध्याच्या संत्रा पिकापेक्षा 3 ते 4 पट अधिक उत्पादन मिळत असल्याने शेतकर्‍यांचा अधिक आर्थिक लाभ होणार आहे. कंपनीचा जळगावला अन्न प्रकिया प्रकल्प असून आता मोर्शी, जि. अमरावती येथे संत्रा व मोसंबीवर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.यावेळी कोका कोलाच्या आशिया पॅसिफीक ग्रुपचे प्रेसिडेंट जॉन मर्फी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, कोका कोलाचे इंडिया ण्ड साऊथवेस्ट आशिया विभागाचे प्रेसिडेंट टी. कृष्णकुमार, कंपनीचे
एक्झिक्युटीव्ह आणि बॉटलिंग इन्व्हेस्टमेंट्स ग्रुपचे प्रेसिडेंट इरिअल फिनान, तसेच संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. तसेच शेतकर्‍यांनी उत्पादित केलेले स्वीट ऑरेंज फळे मुख्यमंत्र्यांना भेट दिली.