फळांसह विक्रेत्याची टपरीच चोरीला : जळगावातील प्रकार

भुसावळ/जळगाव : शहरातील नारायण पार्क, जानवी हॉटेलजवळ असलेल्या फळ विक्रेत्याची दुकानाची टपरीसहीत फळे ठेवलेली टपरी चोरट्यांनी लांबवल्याने विक्रेत्याला 35 हजारांचा फटका बसला. या प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शनीपेठ पोलिसात गुन्हा
सुरेश बळीराम जाधव (37, रा.म्हसळसाई पार्क, ज्ञानदेव नगर, जळगाव) हे फळ विक्रेते असून त्यांची नारायण पार्क भागातील जानवी हॉटेलजवळ फळ विक्री करण्याची लोखंडी टपरी आहे. फळ विक्री करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवार, 16 फेब्रुवारी रोजी दिवसभर विक्री करून रात्री 9 वाजता ते दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फळे असलेली टपरीच चोरून नेली. त्यात सर्व प्रकारची फळे मिळून 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल होता. हा प्रकार गुरुवार, 17 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता समोर आला आहे. याबाबत सुरेश जाधव यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल परीष जाधव करीत आहे.