फळे-फुले प्रदर्शन स्पर्धेत राजभवन उद्यान ठरले ‘नंबर १’

0

मुंबई । रुपारेल महाविद्यालय नुकत्याच संपन्न झालेल्या छप्पनाव्या भाजीपाला, फळे-फुलांच्या प्रदर्शन व स्पर्धेत मलबार हिल राजभवन येथील राज्यपालांच्या उद्यानाला फिरता चषक मिळाला आहे. या चषकासोबतच या स्पर्धेत राजभवनने विविध वर्गवारीतील एकूण १२ पुरस्कार पटकावले आहेत. विशेष म्हणजे नागपूर येथील राजभवनातून तब्बल ८५० किमी प्रवास करून राजधानीत दाखल झालेल्या जेमिनी गुलाबाला ६० स्पर्धकांमधून ‘किंग ऑफ रोझेस’ (गुलाबांचा राजा) हा सर्वोच्च किताब देण्यात आला आहे.

रुपारेल महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जवळजवळ ३०० उद्याने सहभागी झाली होती. यात वैशिष्ट्यपूर्ण पुष्पसजावटीसाठी राजभवनाला पहिले पारितोषिक देण्यात आले आहे.

‘नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ द ट्रीज’ (वृक्षमित्र) या संस्थेने ११ व १२ फेब्रुवारीला या स्पर्धेचे आयोजिन केले होते. शासकीय, निमशासकीय संस्था, पालिका, रेल्वे, व्यावसायिक संस्थांसाठी १००० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या उद्यानांच्या या स्पर्धेत राजभवनाला फिरता चषक मिळाला. याशिवाय राज्यपालांच्या बंगल्याच्या सभोवतालच्या बगीच्याला २००० चौ.मी. खालील उद्याने प्रवर्गातही फिरता चषक मिळाला. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुष्प स्पर्धेतील विजेत्यांना तर इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीचे माजी संचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मनमोहन शर्मा यांच्या हस्ते उद्यान स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी फ्रेंड्स ऑफ ट्रीज या संस्थेच्या मानद अध्यक्षा फिरोझा गोदरेज, अध्यक्ष डॉ. अशोक कोठारी व उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत आदी उपस्थित होते.

गुलाब वनातील २५ गुलाब

नागपूर येथील राजभवन येथे असलेल्या जैवविविधता उद्यानातील गुलाबवनातून (रोझ गार्डन) या स्पर्धेत विविध प्रजाती तसेच रंगांचे एकूण २५ गुलाब पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४ गुलाबांना प्रथम क्रमांकाचे तर पाच गुलाबांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. सध्या चेन्नई येथे तामिळनाडूच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणार्‍या राज्यपाल विद्यासागर राव यांनी या कामगिरीबद्दल राजभवनातील अधिकारी तसेच उद्यान कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे.