जळगाव । आज अतिक्रमण निर्मुलन विभागातर्फे शहरातील पंकज अॅटो परिसरात अतिक्रमित ओटे काढण्याचे काम करण्यात आले. यानंतर फ्रुट गल्लीत माजी नगरसेवक जितेंद्र मुंदडा यांच्या दुकानासमोरील अतिक्रमीत ओटा काढण्यासाठी पथक गेले असता तेथे मुंदडा यांनी विरोध दर्शविला. मुंदडा यांनी अतिक्रमण काढण्यासाठी दोन दिवसापूर्वी नोटीस देणे बंधनकारक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांनी तशा सूचना दिल्या असल्याचे सांगितले. मुंदडा यांनी खान यांच्याशी हुज्जत घालत कारवाई करण्यात अडथळा निर्माण केला. हा वाद जळपास 2 तास चालला. यानंतर खान यांनी याबाबत आयुक्त चंद्रकांत डांगे यांना भ्रमणध्वनीव्दारे माहिती दिली. माहिती मिळताच आयुक्त डांगे हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मुंदडा यांनी डांगे यांच्यासोबत देखील वाद घातला असल्याचे समजते. दरम्यान, आज सकाळी फ्रुट गल्लीतील व्यापार्यांना अतिक्रमण अधिकक्षक एच. एम. खान यांनी ते अतिक्रमण काढण्यासाठी येत असल्याची सूचना दिली. यानंतर व्यापार्यांचे शिष्टमंडळ हे महापालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी गेले होते. याकालवधीत त्यांनी आमदार राजुमामा भोळे यांची भेट घेूवन त्यांची समस्या मांडली असता त्यांनी देखील आयुक्तांशी चर्चा करतो असे आश्वासन दिले. याकालावधीत पंकज ऑटोजवळ अतिक्रमण काढतांना वाद उद्भवल्याने आयुक्त घटनास्थळी गेले. शिवाजी रोड येथे जितेंद्र मुंदडा यांच्या दुकानाचे ओटे तोडण्यासाठी गेले असता व्यापार्यांनी डी मार्केशन करून देण्याची मागणी केली. यावर आयुक्तांनी नगररचना विभागाचे शेख यांना डी मार्केशन केले आहे का याची विचारणा केली. परंतु, ते व्यवस्थितपणे उत्तर देवू शकले नाही. जितेंद्र मुंदडा यांच्या दुकानाचा ओटा तोडल्यानंतर तेथे मोठी गटर दिसल्याने तेथील काम बंद करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी दोन दिवसांत डि मार्केशन करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले.